ठाणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात झालेल्या मुबलक पावसामुळे मुंबईकरांना पाणीप्रश्न मिटण्याची चिन्हे आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा धरण मंगळवारी सकाळी सहा वाजून १५ मिनिटांनी भरले आहे. धरणाचे ९ आणि १० क्रमांकाचे दरवाजे उघडण्यात आले असून संबंधित परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सुचना शहापूरच्या तहसीलदारांनी दिल्या आहेत.

मुंबईकरांना अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या तलावातून पाणी पुरवठा केला जातो. सात पैकी तुळशी, मोडकसागर आणि विहार तलाव सोमवारीच भरुन वाहू लागले होते. मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास तानसा धरणही भरुन वाहू लागले आहे.

तानसा धरणाचे ९ आणि १० क्रमांकाचे दरवाजे उघडण्यात आले असून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सर्व संबंधित सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील आणि पोलीस दलाला सतर्क राहण्याच्या सुचना शहापूरमधील तहसीलदार यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, मुंबईकरांना वर्षभर सुरळीत आणि मुबलक पाणीपुरवठा करता यावा यासाठी १ ऑक्टोबर रोजी या सातही तलावांमध्ये एकूण १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष पाणीसाठा असणे गरजेचे आहे. आत्तापर्यंत या तलावांमध्ये ९ लाख दशलक्ष लिटरपेक्षा पाणी उपलब्ध झाले आहे.