मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रांच्या परिसरात गुरुवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे एका दिवसात तलावांतील साठय़ात तब्बल ८९,४९१ दशलक्ष लिटर पाण्याची भर पडली आहे. मुंबईमध्ये विश्रांती घेणाऱ्या पावसाचे तलावक्षेत्रात बरसणे सुरूच आहे. त्यामुळे तुळशी आणि मोडक सागरपाठोपाठ तानसा आणि विहारही ओसंडून वाहण्याच्या मार्गावर आहेत.
पावसाने शुक्रवारी विश्रांती घेतल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला. मात्र तलावक्षेत्रामध्ये पावसाचा मुक्काम कायम आहे. शुक्रवारी सकाळी ६ वाजता पूर्ण झालेल्या २४ तासांमध्ये मोडकसागरमध्ये १३२.२० मि.मी., तानसामध्ये १२२.८० मि.मी., विहारमध्ये १२४.८० मि.मी., तुळशीमध्ये १३५ मि.मी., अप्पर वैतरणामध्ये ८९.२० मि.मी., भातसामध्ये १५६ मि.मी., तर मध्य वैतरणामध्ये ११९.३० मि.मी. पावसाची नोंद झाली. तानसामधील साठय़ाने आज १२७.१६ मीटरची, तर विहारमधील साठय़ाने ७८.४९ मीटरची पातळी गाठली आहे. हे दोन्ही तलाव भरून वाहण्यासाठी अनुक्रमे १.४७ मीटर व १.७३ मीटर पाण्याची आवश्यकता आहे. पावसाचा तलावक्षेत्रातील मुक्काम पाहता हे तलाव लवकरच भरून वाहतील, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
मुसळधार पावसामुळे तलावांमध्ये आज ८,९२,७२२ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध झाले आहे.