सुशांत मोरे

१५ दिवसांत जवळपास दररोज तांत्रिक दोष; ५०० हून अधिक लोकलफेऱ्या रद्द

तांत्रिक बिघाड, पावसाळापूर्व कामे, उन्हाळी विशेष गाडय़ांना प्राधान्य यामुळे गेल्या पंधरा दिवसांत मध्य रेल्वेवरील प्रवाशांना लोकल प्रवास असह्य़ झाला आहे. एरव्ही आठवडय़ाला तीन-चार छोटे-मोठे बिघाड अनुभवणाऱ्या मध्य रेल्वेवर गेले १५ दिवस दररोज पाच ते सहा छोटे मोठे तांत्रिक दोष वाहतूक विस्कळीत करीत आहेत. गेल्या १५ दिवसांपासून दररोज सरासरी ३०-४० लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या असून मध्य रेल्वेचा एकूण वक्तशीरपणाही ९० टक्क्यांच्या आत घसरला आहे.

काही महिन्यांपूर्वी मुंबईतील रेल्वे प्रकल्पाच्या आढावा बैठकीत रेल्वेचा वक्तशीरपणात सुधारणा करा, असे आदेश रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिले होते. त्यानंतर मध्य रेल्वेने यासाठी काही प्रयत्नही केले; परंतु गेले १५ दिवस सातत्याने प्रवाशांना विस्कळीत लोकलसेवेला सामोरे जावे लागत आहे. रेल्वेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंधरा दिवसांपूर्वी आठवडय़ाला एक मोठा बिघाड व दोन ते तीन छोटे बिघाड अशी सरासरी होती. आता हेच प्रमाण दिवसाला एक मोठा बिघाड आणि चार ते पाच छोटे बिघाड असे झाले आहे. पंधरा दिवसांतील प्रत्येक दिवशी होणारे छोटे-मोठे बिघाड, रेल्वे फाटक उघड-बंद होणे इत्यादी कारणांमुळे लोकल फेऱ्या रद्द करण्याचे प्रमाणही वाढले आहे. दिवसाला सरासरी ३० ते ४० लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागत असून सर्वच लोकलफेऱ्यांच्या वक्तशीरपणावर परिणाम झाल्याची माहिती रेल्वेतील अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या १५ दिवसांत ५०० हून अधिक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

पावसाळ्याआधीच दैना

मध्य रेल्वेकडून पावसाळापूर्व कामे केली जात आहे. यापैकी रुळांच्या कामांमुळे भायखळा ते चिंचपोकळी, घाटकोपर ते भांडुप व त्यापुढील अन्य काही स्थानकांदरम्यान लोकल गाडय़ांना वेगमर्यादा आखून दिली आहे. परिणामी प्रतितास ८० ते १०० च्या वेगाने धावणाऱ्या लोकल काही पट्टय़ांत प्रतितास ६० ते ७० च्या वेगाने धावत आहेत. त्यामुळे लोकलचा वेग मंदावला असून त्याचा वेळापत्रकावरही परिणाम होत आहे.

उन्हाळी विशेष गाडय़ांना प्राधान्य

मध्य रेल्वेने उन्हाळी विशेष गाडय़ा सोडल्या होत्या. त्याची संख्याही मोठी होती. दररोज नियमितपणे २१० मेल-एक्स्प्रेस अप-डाऊन करत असतानाच त्यात १५० ते २०० उन्हाळी विशेष फेऱ्यांची भर पडली. उत्तर भारताबरोबरच दक्षिणेकडेही जाणाऱ्या या फेऱ्यांची संख्या अधिक आहे. मुंबईत पुन्हा परतताना या गाडय़ांना बराच उशीर होत असून त्यांना प्राधान्य देताना लोकल गाडय़ांना बाजूला ठेवावे लागत आहे. त्यामुळे सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी लोकल वेळापत्रकाचा पुरता बोजवारा उडत आहे.

हार्बरचीही दैनाच

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गाबरोबरच हार्बर मार्गावरील लोकल सेवाही विस्कळीत होत आहे. सिग्नल बिघाड, ओव्हरहेड वायरमध्ये बिघाडांचा सर्वाधिक सामनाही करावा लागत असून या मार्गावरील लोकलचे वेळापत्रक बिघडलेले आहे.

पंधरवडय़ातील रेल्वे बिघाडाच्या घटना

* २१ मे- आंबिवली ते टिटवाळादरम्यान रुळाला तडा

*  २६ मे- कुर्ला स्थानकात रात्री नऊच्या सुमारास एका लोकलच्या डब्याचे चाक रुळावरून घसरले

*  २८ मे- कळवा येथे दुपारी एक वाजता सिग्नल बिघाड- दोन्ही धिम्या मार्गावरील लोकल सेवा दोन तास विस्कळीत- ४० हून अधिक लोकल फेऱ्या रद्द

*  ४ जून- सायंकाळी ५.४० च्या सुमारास सायन ते माटुंगादरम्यान ओव्हरहेड वायरवर झाडाची फांदी पडली, तांत्रिक बिघाड- २० पेक्षा जास्त लोकल फेऱ्या रद्द

*  ५ जून- सकाळी पाचच्या सुमारास डोंबिवलीजवळ सिग्नल बिघाड, जवळपास ५० लोकल फेऱ्या रद्द

*  ६ जून- सकाळी सहाच्या सुमारास खडवलीजवळ रुळाला तडा, ४० पेक्षा अधिक लोकल फेऱ्या रद्द

मध्य रेल्वेचे वेळापत्रक सुरळीत करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. बिघाड होऊ नये यासाठी देखभाल – दुरुस्तीकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. सध्या पावसाळापूर्व कामे केली जात असल्याने काही ठिकाणी वेगमर्यादा आखून देण्यात आली आहे. कामे पूर्ण होताच ती वेगमर्यादा काढली जाईल.

– ए.के. गुप्ता, महाव्यवस्थापक मध्य रेल्वे (अतिरिक्त कार्यभार)