मुंबई : विनयभंग केल्याप्रकरणी अभिनेते नाना पाटेकर यांच्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारीचा गुन्हे शाखेकडून तपास करावा, अशी मागणी अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्याकडे केली आहे.
तिने पोलीस आयुक्तांना तसे पत्र लिहिले असून या प्रकरणी तक्रार निकाली काढण्याचा पोलिसांनी दिलेला अहवाल रद्द करण्याची मागणीही तिने केली आहे. जून महिन्यात ओशिवारा पोलिसांनी अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांकडे ‘बी-समरी’ अहवाल सादर केला होता. या अहवालानुसार नाना पाटेकर यांच्या विरोधात केलेल्या आरोपांमध्ये पोलिसांना कोणतेही पुरावे सापडले नसल्याचे म्हटले होते. मात्र तनुश्रीने आता या प्रकरणी थेट पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली आहे. तसेच प्रकरणाचा गुन्हे शाखेकडून नव्याने तपास करण्याची मागणी केली आहे. तिच्या वकिलांनी पोलीस आयुक्त बर्वे यांना पाठविलेल्या ई-मेल संदेशात पोलिसांकडून गुन्ह्य़ाचा योग्य तपास होत नसल्याचे म्हटले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 4, 2019 2:13 am