अभिनेत्री तनुश्री दत्ताने ओशिवरा पोलिसांकडे नाना पाटेकर यांची नार्को, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर टेस्ट करण्याची मागणी केली आहे. तनुश्रीने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. तनुश्रीने आपल्या वकिलांमार्फत या चाचण्या करण्यासाठी ओशिवरा पोलिसांकडे अर्ज केला आहे. तनुश्रीने नाना पाटेकर यांच्यासह गणेश आचार्य, सामी सिद्दीकी आणि राकेश सारंग यांची सुद्धा नार्को, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर टेस्ट करण्याची मागणी केली आहे. तनुश्रीने १० ऑक्टोंबरला ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये या चौघांविरोधात रीतसर तक्रार दाखल केली.

दरम्यान हॉर्न ओके प्लीज या सिनेमाच्या सेटवर नेमके त्या दिवशी काय घडले त्याविषयी नवी माहिती समोर आली आहे. ज्या दिवशी या गाण्याचे शुटिंग सुरु होते त्यादिवशी नेमके काय घडले हे सेटवर असलेले स्पॉटबॉय रामदास बोर्डे यांनी सांगितले आहे. नाना पाटेकर यांनी तनुश्री दत्ताला दुपारी 12 च्या दरम्यान व्हॅनिटी व्हॅनमध्ये बोलावलं होतं असा खुलासा बोर्डे यांनी केला आहे.

एवढंच नाही तर नाना पाटेकरांनी जेव्हा तनुश्रीला व्हॅनिटी व्हॅनमध्ये बोलावलं त्यानंतर तिथून ती तावातावाने बाहेर पडली. डान्स मास्टर गणेश आचार्य यांच्याकडे गेली आणि तिने आपली तक्रार केली. मात्र गणेश आचार्य यांनी तनुश्री दत्ताची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र ती इंग्रजीत भांडू लागली. ती जे काही बोलत होती त्यावरून इतकेच समजत होते की नाना पाटेकरांनी काहीतरी चुकीचे वर्तन केले आहे.

तिच्या बोलण्याचा सगळा रोख तसाच होता. मात्र सगळेजण तनुश्रीची समजूत घालत होते. नाना पाटेकर मोठा माणूस आहे तुझे करीअर बरबाद होईल असे तिला सांगितले जात होते. मात्र तनुश्रीने कोणाचेही ऐकले नाही. तनुश्री तिची बाजू ओरडून ओरडून सांगत होती. काही वेळातच ती तिथून निघून गेली. थोड्या वेळाने नाना पाटेकरही व्हॅनिटी व्हॅनमधून बाहेर आले. काही घडलेच नाही अशा अविर्भावात ते वावरू लागले. पण शुटिंग बघणाऱ्या स्पॉटबॉयना त्यांच्या रोजगाराची चिंता असल्यामुळे कोणीही काही बोलले नाही.