19 October 2019

News Flash

नाना पाटेकर अजूनही माझा छळ करतात – तनुश्री दत्ता

अभिनेते नाना पाटेकर अजूनही आपल्याला धमकावतात त्यांच्याकडून छळ सुरु आहे असा गंभीर आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ताने केला आहे.

तनुश्री दत्ता, नाना पाटेकर

अभिनेते नाना पाटेकर अजूनही आपल्याला धमकावतात त्यांच्याकडून छळ सुरु आहे असा गंभीर आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ताने केला आहे. नाना पाटेकरांचा वकिल असल्याचा दावा करणारा एक माणूस तनुश्रीच्या जवळच्या माणसांना, प्रसारमाध्यमांना फोन करुन तनुश्रीला कोर्टात खेचणार असल्याचे सांगत आहे. दहावर्षानंतरही कायद्याची धमकी देऊन मला त्रास दिला जातोय. संपूर्ण जग हा प्रकार बघत आहे असे तनुश्रीने प्रसिद्धीस दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.

सध्या नाना पाटेकर जैसलमेरमध्ये साजिद खानच्या हाऊसफुल ४ च्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहेत. या वादानंतर फराह खानने एक ग्रुप फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. आम्ही जैसलमेरला शूटला निघालो आहोत अशी माहिती तिने दिली आहे. फराहच्या भूमिकेने आपल्याला धक्का बसला. ती स्वत: एक महिला आहे असे तनुश्रीने म्हटले आहे.

नाना पाटेकरांनी तनुश्री दत्ताचे आरोप फेटाळून लावले आहे. चित्रीकरणाच्यावेळी सेटवर ५० जण होते. त्यामुळे तनुश्री बरोबर गैरवर्तन करण्याचा प्रश्नच येत नाही असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान या संपूर्ण वादावर नाना पाटेकर पत्रकार परिषद घेऊन तनुश्री दत्ताला उत्तर देणार आहेत. अमेरिकेहून नुकत्याच भारतात परतलेल्या अभिनेत्री तनुश्री दत्ता हिनं अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तन केल्याचा खळबळजनक आरोप केला होता.

#metoo मोहीमेबद्दल बोलताना तिनं नानांनी केलेल्या असभ्य वर्तनावर भाष्य केलं. २००८ साली ‘ हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटादरम्यान नानांनी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असभ्य वर्तन केलं असा आरोप तिनं मुलाखतीत केला होता. गैरवर्तणुकीचा आरोप करणाऱ्या अभिनेत्री तनुश्री दत्ताला नाना पाटेकर कायदेशीर नोटीस पाठवणार आहे. ‘तनुश्रीनं केलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे आहेत. तिनं खोटी माहिती पुरवली आहे त्यामुळे तिला आम्ही कायदेशीर उत्तर देऊ’, अशी माहिती नाना पाटेकर यांचे वकिल राजेंद्र शिरोडकर यांनी दिली आहे.

First Published on September 29, 2018 4:27 pm

Web Title: tanushree dutta fresh allegations on nana patekar still harassing me