अंमली पदार्थाची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या टांझानियाच्या नागरिकाला मुंबई पोलिसांनी अटक केली. इब्राहिम अब्दलाह शबानी असे या टांझानियन नागरिकाचे नाव आहे. इब्राहिमकडे ६ किलो ड्रग्ज आढळून आले. इब्राहिम मस्कत या ठिकाणी निघाला होता. त्याच्या मुंबई विमानतळावरच्या हालचाली संशयास्पद वाटल्या त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी त्याला अडवले आणि त्याची बॅग तपासली. सुरुवातीला तो बॅग तपासण्यास तयार नव्हता. मात्र त्याची बॅग तपासल्यावर त्यामध्ये ६ किलो अफॅड्रीन हा अंमली पदार्थ आढळून आला.

तुम्ही जी म्हणताय ही बॅग माझी नाही ही मला कोणतीही विमानतळाच्या गेटवर दिली असा बनाव त्याने सुरूवातीला केला. मात्र त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने तस्करीसंदर्भातली कबुली दिली. रविंद्र यादव यांना सुरुवातीला या टांझानियाच्या नागरिकाबाबत संशय आला. त्यानंतर त्याची बॅग तपासण्यात आली ज्यामध्ये हे ड्रग्ज आढळून आले. अंमली पदार्थाची दोन पाकिटे त्याने आपल्या बॅगमध्ये लपवली होती असेही स्पष्ट झाले. एनसीबी टीमने त्याला अटक केली असून आता पुढील चौकशी सुरू आहे अशीही माहिती मिळते आहे.