शोभिवंत माशांची निपजही करणार
प्रसिद्ध तारापोरवाला मत्स्यालयामधील माशांसोबत ऑक्टोपस, स्टिंग रे, पफर फिश, पाणसर्प विहार करणार आहेत. या मत्स्यालयात शोभिवंत माशांची निपजही करण्यात येणार आहे.
मुंबईच्या प्रमुख पर्यटनास्थळांमध्ये तारापोरवाला मत्स्यालयाचा समावेश आहे. १९५१ मध्ये मुंबईतील डी. बी. तारापोरवाला यांनी दिलेल्या देणगीतून मत्स्यालयाची उभारणी करण्यात आली. त्यानंतर कित्येक वर्षे डागडुजी न केल्याने लयास गेलेल्या मत्स्यालयाकडे पर्यटकही पाठ फिरवू लागले होते. २०१४ मध्ये मत्स्यालयाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले. वीस कोटी रुपये खर्चून २०१५ मध्ये नवेकोरे मत्स्यालय पुन्हा पर्यटकांच्या भेटीला आले. मात्र गेल्या तीन वर्षांमध्ये देखरेख न झाल्याने काही प्रदर्शन टाक्या खराब झाल्या आहेत. आता टप्प्याटप्प्याने या प्रदर्शन टाक्यांच्या दुरुस्तीचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. त्यापैकी एका टाकीची दुरुस्ती करण्यात आली आहे. याशिवाय काही आकर्षक सागरी जिवांचे आगमनही मत्स्यालयात झाले आहे.
समुद्रात पायांनी भक्ष्याला जखडून ठेवणाऱ्या ऑक्टोपसचे आगमन मत्स्यालयात झाले आहे. हा ऑक्टोपस एका मच्छीमाराच्या जाळ्यात अडकला होता. मच्छीमारांनी वाचवलेले हे ऑक्टोपस मत्स्यालयाकडे आले आहे. याशिवाय खोल समुद्रातील प्रवाळांमध्ये राहणाऱ्या ‘क्लाऊन फिश’चे दर्शनही पर्यटकांना सध्या या ठिकाणी होत आहे.
या माशांसाठी प्रशासनाने खास समुद्री प्रवाळ टाक्यांत सोडले आहे. शरीर फुगवून स्वत:चे संरक्षण करणारा विलक्षण पफर फिश आणि पाणसाप पर्यटकांच्या आकर्षणाच्या केंद्रबिंदू ठरत आहे. याशिवाय दरवर्षी गणेशोत्सवात चर्चेचा विषय ठरणारे १२ स्टिंग रे देखील प्रदर्शन टाक्यांमध्ये सोडण्यात आल्याची माहिती साहाय्यक मत्स्यव्यवस्थापक अधिकारी निखिल नागोठकर यांनी दिली. येत्या कालावधीत आणखी आकर्षक मासे दाखल होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शोभिवंत माशांची निपज
मत्स्यालयातील शोभिवंत माशांच्या कक्षामध्ये मोठय़ा संख्येने माशांचे प्रजनन होते. प्रजननाची ही क्षमता लक्षात घेता प्रशासनाने काही महिन्यांमध्ये स्वतंत्र मत्स्य प्रजनन कक्ष उभारण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मत्स्यालयाचे अभिरक्षक (क्युरेटर) पुलकेश कदम यांनी दिली. मत्स्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या इमारतीच्या रिकाम्या जागेत हे केंद्र उभारण्यात येईल. यामध्ये पैदास झालेल्या माशांना प्रदर्शनासाठी वापरण्यात येईल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 7, 2019 12:34 am