18 January 2019

News Flash

मत्स्यालयातील दोन कासवांचा मृत्यू

मत्स्यालयात असलेले हॉक्सबिल प्रजातीचे मादी कासव कर्करोगाने ग्रस्त होते.

एकाचा हृदयविकाराच्या झटक्याने; दुसऱ्याचा पोटाच्या संसर्गामुळे मृत्यू झाल्याचे निदान

चर्नीरोड येथील तारापोरवाला मत्स्यालयातील एका कासवाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने तर दुसऱ्याचा पोटाच्या संसर्गामुळे झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात या दोन्ही कासवांचा अचानक मृत्यू झाला होता. गेल्या वीस वर्षांपासून मत्स्यालयात असलेल्या तीन कासवांपैकी दोघांचा मृत्यू झाल्याने आता अवघे एकच कासव असून तेही गंभीर आजारी असल्याने त्याला डहाणू येथील कासव शुश्रूषा केंद्रात हलविण्यात आले आहे.

मत्स्यालयात असलेले हॉक्सबिल प्रजातीचे मादी कासव कर्करोगाने ग्रस्त होते. कर्करोगाच्या गाठीवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याचा कर्करोग पूर्णपणे बरा झाल्याचा दावाही डॉक्टरांनी केला होता. या कासवाचा ३१ मे रोजी मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात या कासवाचा मृत्यू कर्करोगाने नव्हे तर पोटाच्या संसर्गामुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. खाण्यातून या कासवाला पोटाचा संसर्ग झाला असावा आणि तो बळावल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचे या अहवालात म्हटले आहे. तर दुसऱ्या ग्रीन सी प्रजातीच्या मादी कासवाचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचे निष्पन्न झाले असले तरीही या कासवालाही पोटाचा संसर्ग झाल्याची माहिती मत्स्यालयाचे अभिरक्षक अजिंक्य पाटील यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

या दोन्ही जुन्या कासवांचा एकाच आठवडय़ात मृत्यू झाल्याने मत्स्यालयातील सागरी जीवांच्या संवर्धनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सागरी जीवांच्या संवर्धनाची आणि त्यासाठी उभारण्यात आलेल्या यंत्रणेची तसेच खाद्यपुरवठा, जलशुद्धीकरण यंत्रणा आदी तांत्रिक बाबींचीही तपासणी सागरी परिसंस्थेच्या तज्ज्ञ समितीकडून करण्यात यावी, अशी मागणी मुंबई शहराचे मानद वन्यजीव रक्षक सुनीश कुंजू यांनी केली आहे. या बाबींची तपासणी करण्यासाठी सागरी परिसंस्थेचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांसह मत्स्यालयाला भेट देण्यात येणार असून त्यासाठी प्रशासनाकडे वेळ मागण्यात आल्याचेही कुंजू म्हणाले. दरम्यान, या भेटीसाठी प्रशासनाने सकारात्मकता दर्शविली असून तज्ज्ञ समितीने भेट दिल्यास आम्हालाही त्यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. मत्स्यव्यवसाय विभागाच्या आयुक्तांशी चर्चा करून लवकरच भेटीची वेळ दिली जाईल, असे अजिंक्य पाटील यांनी सांगितले.

मृत कासवांचे जतन

मृत हॉक्सबिल आणि ग्रीन सी कासव मत्स्यालयाचा खऱ्या अर्थाने ठेवा होता. त्यामुळे त्यांचे जतन केले जाणार आहे. या दोन्ही कासवांची ‘टॅक्सिडर्मी’ केली जाणार आहे. ‘टॅक्सिडर्मी’मध्ये प्राण्याची कातडी किंवा त्याचे आवरण स्वच्छ करून ते टिकविण्याकरिता प्रक्रिया केली जाते. त्यानंतर मूळ प्राण्याच्या मोजमापानुसार त्याचा सांगाडा निर्माण करून त्यावर ती कातडी किंवा बाह्य़ आवरण चढविले जाते. ही संपूर्ण प्रक्रिया मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातर्फे करण्यात येणार असून त्यानंतर ती कासवे मत्स्यालयात ठेवण्यात येणार आहेत.

First Published on June 14, 2018 1:59 am

Web Title: taraporewala aquarium tortoise death