महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या सरकारी वाहनावरील लाल दिव्यावरुन ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) बृहन्मुंबई महानगरपालिकेला (बीएमसी) नोटीस पाठवली आहे.


बीएमसीला १३ ऑक्टोबर रोजी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. यामध्ये १ मे २०१७ रोजी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने काढलेल्या अधिसूचनेचा संदर्भ देण्यात आला आहे. या अधिसुचनेनुसार, लाल दिवा वापरण्याची परवानगी देण्यात आलेल्या पदांच्या यादीत मुंबईच्या महापौरांचा उल्लेख नाही. त्यामुळे महापौर महाडेश्वर यांच्या सरकारी वाहनावर लावण्यात आलेला लाल दिवा अनधिकृत आहे.

बीएमसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, शुक्रवारी आम्हाला ही नोटीस मिळाली. नवी इनोव्हा क्रिस्टा ही सरकारी कार महापौरांनी गेल्याच आठवड्यात वापरायला सुरुवात केली आहे. या कारवर लाल दिवा लावण्यात येऊ नये अशी सूचना आम्ही यापूर्वीच महापौरांच्या कार्य़ालयाला दिली होती. दरम्यान, ही कार घेऊन महापौर शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुखांचे निवासस्थान मातोश्री येथे गेल्याने हा दिवा काढता आला नाही. मात्र, दिवा झाकण्यात आला असून त्याचा वापर केला जात नाही.

दरम्यान, आपल्याला या नोटिशीची कल्पना नव्हती. मात्र, कुठल्या आधारावर ही नोटीस पाठवण्यात आली याची माहिती घेऊ असे महापौर महाडेश्वर यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देताना सांगितले.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने काढलेल्या अधिसुचनेनुसार, केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, जी सरकारी वाहने आपत्कालिन आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या कामावर असतील त्याच वाहनांवर लाल, निळा आणि पांढऱ्या रंगाचे दिवे लावता येतील. यामध्ये अग्निशामक, पोलीस आणि नैसर्गिक आपत्ती व्यावस्थापकाचे वाहन यांनाच या दिव्यांची परवानगी असेल.