६० वाहतूकदारांवर कारवाई; आठ बसगाडय़ांचे परवाने रद्द
सुटीच्या हंगामी काळात बसगाडय़ांच्या टपावर दोरखंडाच्या साहाय्याने वजनदार सामान बांधून मालाची वाहतूक करणाऱ्या सुमारे ६० खासगी बस वाहतूकदारांवर ताडदेव प्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. यात ५ ते १२ मे कालावधीत तब्बल २९१ बसगाडय़ांची तपासणी करण्यात आली असून यात सुमारे ६० जणांवर कारवाई करण्यात आली. त्या वेळी कर आणि दंडात्मक कारवाई म्हणून ९७ हजार ५२१ रुपये वसूल करण्यात आले.
दरवर्षी सुटीचा हंगाम सुरू होताच लाखो मुंबईकर आपल्या गावी किंवा शहराबाहेरील पर्यटनस्थळी जात असतात. अशा काळात रेल्वेचे तिकीट मिळत नसल्याने खासगी बसगाडय़ांना विशेष मागणी असते. याच काळात वाहतूकदारांकडूनही याचा गरफायदा घेत बसगाडीच्या भाडय़ात वाढ केली जाते. अनेकदा तर आसन क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक केली जाते. त्यात बसगाडीच्या टपावरून अवजड मालाची वाहतूक केली जाते. त्यामुळे प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण होतो. या पाश्र्वभूमीवर ताडदेव प्रादेशिक परिवहन विभागाकडून एक विशेष मोहीम राबवून ही कारवाई करण्यात आली. यात चार बसगाडय़ांचा प्रवासी वाहतूक परवाना जप्त तर आठ चालक परवाने रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
गेल्या आठ ते दहा वर्षांतील रस्ते अपघातांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास हजारो अपघात ओव्हरलोिडगमुळे झाले असल्याचे समजते. यात प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसगाडय़ांवरून वजनदार सामान वाहून नेण्यास न्यायालयाकडून मनाई करण्यात आली असतानाही खासगी वाहतूकदार नियमांना पायदळी चिरडून न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करत असल्याचे पाहायला मिळत आहे. यात परिवहन विभागाकडेही अपुरे मनुष्यबळ असल्याने अशा प्रकारच्या धोकादायक वाहतुकीला आळा बसणे कठीण असल्याचे पाहायला मिळत आहे.