वर्षभरात वाहनचालकांकडून २३ हजारांचा दंड वसूल
शहराच्या ध्वनी प्रदूषणात भर घालणाऱ्या कर्णकर्कश वाहन भोंग्यांवर कारवाई करण्याचा सपाटा लावणाऱ्या यंत्रणेला, वाहनचालकांच्या अजब भोंगळपणाचे दर्शन घडत आहे. यात रस्त्यावरील इतर वाहनचालकाला निर्देश देण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या वाहनातील भोंग्याची अवस्था सुस्थितीत नसल्याने ताडदेव प्रादेशिक परिवहन विभागाकडून अशा चालकांवर कारवाईचा फास आवळण्यात आला आहे. यात गेल्या वर्षभरात सुमारे २३ जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून २३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
सध्या मुंबई व उपनगरात दरवर्षी एक लाख दुचाकी आणि ४० हजार चारचाकींची भर पडत आहे. यातील किमान ८ ते १० टक्के चालक वाहनांमध्ये अतिआवाजी वाहन भोंगे बसवत आहेत. यात एका बाजूला बेदरकारपणे वाहन चालवून कणकर्कश भोंगे वाजवून ध्वनी प्रदूषणात भर घालण्याची प्रथा सुरू आहे. तर दुसरीकडे काही वाहनचालक याचे विरुद्ध टोक गाठत असल्याचे समोर येत आहे. शहरातील अनेक चालक नादुरुस्त भोंगे असलेले वाहन रस्त्यावरून बेफिकीरपणे चालवत आहेत.रस्त्यावर वाहन चालवताना इतर वाहनचालकांना तसेच रस्त्यावरून पायी जाणाऱ्या नागरिकांना सूचना किंवा सतर्क करण्यासाठी वाहनातील हॉर्न अत्यंत महत्त्वाचा ठरतो. शहराच्या अनेक वळणावर, चार रस्त्यावर तसेच एखाद्या गाडीच्या बाजूने पुढे जाताना वाहनातील हॉर्नमुळे इतर वाहनचालकाला सूचना देण्यास मदत होते. मात्र शहरातील अनेक वाहनचालकांना हॉर्नचा योग्य वापर तर सोडा, योग्य उपयोगही कळत नसल्याची टीका वाहतूक अभ्यासक करत आहेत.

मोटार वाहन कायद्यानुसार?
रस्त्यावर धावणाऱ्या वाहनातील इंजिन, ब्रेक, हॉर्न, टायर, दिवे, आसन व्यवस्था सुस्थितीत असणे सक्तीचे आहे. मात्र अनेक वाहनचालकांकडून हे नियम पायदळी तुडवले जातात, असे राज्य परिवहन विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
‘हॉर्न’विषयी साक्षरता आवश्यक!
मोटार वाहन कायद्यात दुचाकी, चारचाकी आणि रिक्षाच्या भोंग्यांसाठी डेसिबलची पातळी ठरवून देण्यात आली आहे. तसेच वाहनात हॉर्न बसवणे सक्तीचे आहे. तसे न केल्यास एक हजार रुपयांचा दंड आकारला जातो. मात्र अद्यापही शहरात हॉर्न वाजवण्याविषयी आणि त्यांच्या आवश्यकतेविषयी वाहनचालकांत गांर्भीय दिसत नाही. त्यामुळे हॉर्नविषयीची साक्षरता करणे गरजेचे आहे, असे अभ्यासक सांगतात.