दादर येथे हल्ल्यात जखमी झालेली सोनल लपाशिया या तरुणीवर सोमवारी गैरसमजातून हल्ला झाला. मारेकरी विजय याला आपल्या पत्नीला मारायचे होते. पण त्याची ओळख चुकली आणि त्याने सोनलवर हल्ला केला. ओळख चुकल्याने निष्पापांच्या बळी गेल्याच्या दोन घटना यापूर्वी घडल्या आहेत. नागपुर येथे अशाच एका घटनेत मोनिका नावाची तरुणी मरण पावली तर बीडमध्ये स्फोट होऊन निंबाळकर कुटुंबियांना डोळे गमवावे लागले.
११ मार्च २०११
नागपुरच्या एसआरएम अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणारी मोनिका किरणपुरे (२१) ही विद्यार्थीनी घरी परतत असताना रस्त्यात दबा धरून बसलेल्या श्रीकांत सोनेकर या मारेकऱ्याने तिच्यावर चाकूचे वार करुन हत्या केली. कुणाल नावाच्या तरुणाने मोनिकाच्या एका मैत्रिणीला मारण्याची सुपारी श्रीकांतला दिली होती. मोनिका आणि तिची मैत्रिण या दोघी सारख्याच दिसत असल्याने मोनिका हीच आपली ‘सावज’ आहे, असा मारेकरी श्रीकांतचा समज झाला.
१ डिसेंबर २०१२
बीड जिल्ह्यातल्या अंबेजोगाई तालुक्यातील काळेवाडी गावात झालेल्या रेडियो स्फोटात ओम निंबाळकर (३२) या बसवाहकाचे कुटुंब जखमी झाले. या स्फोटात ओम ,त्याची गर्भवती पत्नी आणि अडीच वर्षांचा मुलगा यांना डोळे गमवावे लागले. वास्तविक केंद्रेवाडी गावातील आबा उर्फ मुंजाबा गिरी आणि गोपिनाथ तरकसे यांच्यात वाद होता. तरकसे याला दहशतवादी ठरविण्यासाठी गिरी याने हा रेडियो बॉम्ब बनवला होता. ‘गोपीनाथ तरकसे’ याच्या नावाने एसटीत रेडियो बॉम्बचे पार्सल ठेवण्यात आले होते. हा रेडियो बॉम्ब पाहून पोलीस तरकसेला दहशतवादी म्हणून पकडतील, अशी त्याची योजना होती. परंतु दुर्देवाने बसवाहक ओम िनबाळकर यांनी ते पार्सल घरी नेले आणि त्याचा स्फोट झाला.     

मुलामुळे वाचला आईचा जीव..
पत्नीला संपविण्याच्याच उद्देशाने मुंबईत आलेला विजय रविवारी तिला भेटण्यासाठी नालासोपाऱ्यातही गेला होता. त्याचवेळी तिच्यावर हल्ला करुन संपवायचे, अशी त्याची योजना होती. मात्र त्यावेळी वैशाली मुलाला सोबत घेऊन आली. मुलासमोर कसे मारायच,े अशा द्विधा मनस्थितीत असलेल्या विजयने विचार बदलला. ते सुमारे अर्धा तास एकत्र होते. आपण दादरला शिवाजी पार्कात जाऊ आणि तिथे सविस्तर बोलू. मुलाला घरी ठेऊन ये असेही त्याने वैशालीला सांगितले. त्यानुसार ती दादरला यायला निघाली. विजय ट्रेनमध्ये पुरुषांच्या डब्यात तर वैशाली महिलांच्या डब्यात चढली होती. मात्र ती मध्येच उतरली. वैशाली ही दादरला कामासाठी येते. विजयने फोन करुन तिला सोमवारी सकाळी दादरला भेटायला बोलावले. रविवारी मुलाला घेऊन ती आली नसती तर विजयने तेव्हाच तिच्यावर हल्ला करुन हत्या केली असती,  असे माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश परब यांनी सांगितले. या घटनेनंतर पोलिसांनी विजयच्या पत्नीला चौकशीसाठी बोलावण्याचा प्रयत्न केला. मात्र ती यायला तयार नव्हती. पोलिसांच्या दूरध्वनीलाही ती प्रतिसाद देत नव्हती. तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक नालासोपारा येथे वैशालीच्या घरीदेखील  जाऊन आले. मात्र ती घरी सापडली नाही. मोबाईलच्या ठावठिकाण्यावरून ती वरळी येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.