बंदर आणि सागरी क्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्यासाठी होत असलेल्या ‘भारतीय सागरी परिषदे’च्या (मेरिटाइम इंडिया समिट) निमित्ताने राज्यातील दोन बंदरांनी देशविदेशातील गुंतवणूकदारांबरोबर ४७ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे.

त्यापैकी ३०.५ कोटींचे करार झाले आहेत. बंदर, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाने आयोजित केलेली ही भारतीय सागरी परिषद २ ते ४ मार्चदरम्यान आभासी पद्धतीने होणार असून त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २ मार्चला करण्यात येणार आहे.

या परिषदेच्या निमित्ताने जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट (एमबीपीटी) यांनी विविध गुंतवणूकदारांबरोबर गेल्या दोन दिवसांत सामंजस्य करार केले. जेएनपीटीने आत्तापर्यंत २३ हजार कोटी रुपयांचे करार केले असून आणखी चार हजार कोटींचे करार पुढील दोन दिवसांत होतील, तर एमबीपीटीने साडेसात हजार कोटींचे करार केले असून एकूण २० हजार कोटींचे करार होतील.

‘‘पुढील दोन दिवसांत आणखी २० हजार कोटी रुपयांचे करार करण्यात येत असून त्यामध्ये विशेषत: तेल क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश असेल,’’ असे ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’चे अध्यक्ष राजीव जलोटा यांनी सांगितले. ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’च्या साडेसात हजार कोटी रुपयांच्या करारामध्ये वॉटर टॅक्सी, क्रूझ टर्मिनल, जहाजदुरुस्ती आणि यॉटसाठी विशेष सुविधा (मरिना) अशा प्रकल्पांचा समावेश आहे.

मुंबईला क्रूझ हब करण्याच्या दृष्टीने होत असलेल्या प्रयत्नांत आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलच्या कामाला २०० कोटींच्या करारांमुळे चालना मिळणार आहे. तसेच २०३० पर्यंत वर्षांला १५ लाख क्रूझ पर्यटकांसाठी सुविधा देण्याची क्षमता यामध्ये असेल. तसेच क्रूझसाठीच्या बंदरातील संचालनासाठी तीन हजार कोटींचा करार झाला आहे.

मुंबई आणि परिसरात यॉटसाठी कोणतीही विशेष सुविधा नाही. त्यामुळे भविष्यात सुमारे ३०० यॉटसाठी बंदराजवळ ८.०२ एकर क्षेत्रावर सुविधा (मरिना) तयार करण्यासाठी ३७० कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे. एचपीसीएल आणि बीपीसीएलच्या माध्यमातून क्रूड तेलाच्या धक्यासाठी दीड हजार कोटींची गुंतवणूक होत आहे. यामध्ये तब्बल २२० मीटर लांबीचे तेलवाहू जहाज उभे करण्याची सोय असेल. यासाठी ३० एकर क्षेत्रावर भराव घालून काम केले जाईल.

करोनाकाळातदेखील..

‘‘करोनाकाळातदेखील जेएनपीटीने मोठी गुंतवणूक मिळवली आहे. बंदरातील सुविधा, संचालन क्षमतेत सुधारणा करण्यासाठी ही गुंतवणूक होते आहे. त्याचबरोबर मोठय़ा प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल,’’ असे जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी सांगितले.