केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, उद्योगपती बाबा कल्याणी प्रमुख पाहुणे

विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाच्या गुढय़ा उभारणाऱ्या तरुणांचा आदर्श समाजासमोर यावा यासाठी ‘लोकसत्ता’ने साकारलेल्या ‘तरुण तेजांकित’ या उपक्रमात शनिवार ३१ मार्चला मुंबईत १२ तरुणांचा सन्मान होणार आहे. केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि उद्योजक बाबा कल्याणी हे या तरुणांना गौरविणार आहेत.

‘प्राइसवॉटरहाऊस कुपर्स’ या आंतरराष्ट्रीय विश्लेषण संस्थेच्या साह्य़ाने एका निष्पक्ष तज्ज्ञ समितीकडून या तरुणांची निवड करण्यात आली. यातच या उपक्रमाचे वेगळेपण आहे. भारतातच नव्हे, तर अमेरिका, स्वीडन, जर्मनी, चीन अशा देशांतही आपल्या उत्पादनांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या उद्योगसंस्कृतीची पताका फडकावीत असलेले ‘भारत फोर्ज’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बाबासाहेब नीलकंठ कल्याणी आणि सनदी लेखापाल, सारस्वत बँकेचे अध्यक्ष ते केंद्रातील विविध महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री असा अनुभव असलेले सुसंस्कृत मंत्री सुरेश प्रभू यांचा सहभाग लक्षणीय ठरणारा आहे. हा गौरव सोहळा ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीवरून नंतर प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

‘लोकसत्ता’तर्फे दरवर्षी गणेशोत्सवाच्या कालावधीत ‘सर्व कार्येषु सर्वदा’ हा दानयज्ञ आयोजित केला जातो. विविध क्षेत्रांमध्ये स्वतला झोकून घेऊन उत्तम कामाची उभारणी करीत असलेल्या संस्थांना आर्थिक मदतीचा हात द्यावा, हा त्यामागील उद्देश. ‘तरुण तेजांकित’ हा त्याच उद्देशाच्या वाटेवरचा पुढचा मुक्काम आहे.

कार्यक्रमाचे प्रायोजक

कार्यक्रमाचे टायटल पार्टनर ‘केसरी टूर्स’ असून ‘मिराडोर’ आणि ‘सारस्वत बॅंक’ हे असोसिएट पार्टनर आहेत. पॉवर्ड बाय एलआयसी हौसिंग फायनान्स लिमिटेड, एम. के. घारे ज्वेलर्स, अनुरुप विवाह संस्था आणि न्युट्रीव्हॅल्यू असून हेल्थपार्टनर ‘आयुशक्ती’ आहेत. ‘ब्रह्मविद्या साधक संघ’ हे हिलिंग पार्टनर, ‘पीडब्ल्यूसी इंडिया’ हे नॉलेज पार्टनर, ‘एबीपी माझा’ हे टेलिव्हिजन पार्टनर आणि ‘फिव्हर १०४ एफएम’ हे रेडिओ पार्टनर आहेत.