संदीप आचार्य 
मुंबई: करोना च्या लढाईत गेले तीन महिने अविश्रांत कार्यरत असलेले डॉ. संजय ओक सोमवारी फोर्टिज रुग्णालयातून करोनामुक्त होऊन घरी परत गेले. राज्य सरकारने मुंबईतील करोना वरील उपचारांची दिशा निश्चित करण्यासाठी तसेच करोना आटोक्यात आणणे व कोमॉर्बीड मृत्यू कमी करण्यासाठी उपाययोजना सुचविण्यासाठी नियुक्त केलेल्या टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे गेल्या शनिवारी त्यांना मुलुंडच्या फोर्टिज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

या टास्क फोर्सचे एक सदस्य असलेल्या डॉ. राहुल पंडित यांच्या देखरेखीखाली डॉ. संजय ओक यांच्यावर उपचार करण्यात आले. आज डॉक्टरांनी त्यांना घरी जाऊ देण्यास परवानगी दिली. त्यानंतर दुपारी डॉ. ओक आपल्या घरी गेले असून आणखी १४ दिवस त्यांना विश्रांती घेण्यास डॉक्टरांनी सांगितले आहे. आपण २० जुलैनंतर पुन्हा करोनाच्या लढाईत सक्रिय होणार असल्याचे डॉ. संजय ओक यांनी सांगितले. मुंबईत करोना वेगाने पसरू लागताच सरकारने मुंबईसाठी डॉ ओक यांच्या अध्यक्षतेखाली सात डॉक्टरांच्या टास्क फोर्सची नियुक्ती केली.

मुंबईतील उपचाराला दिशा देताना तसेच उपचारात समानता आणताना जगभरातील करोना उपचाराचा टास्क फोर्सने अभ्यास केला. तसेच सातत्याने रुग्ण वाढ, त्याची कारणे तसेच गंभीर रुग्ण व उपचार यांचा नियमित आढावा घेतानाच नायर व शीव रुग्णालयात जाऊन रुग्णालयीन उपचार व्यवस्थेला गती देण्याचे काम डॉ. ओक यांनी केले. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मधील एक हजार खाटांचे तात्पुरते रुग्णालय असो की पालिका रुग्णालयात रेमडीसीवीरसारखी महागडी औषधे उपलब्ध करून देण्याचा मुद्दा असो डॉ. ओक यांनी या विषयांचा सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र करोनामुक्त झाले असले तरी आणखी किमान चौदा दिवस त्यांनी सक्तीची विश्रांती घेतली पाहिजे, असा आमचा सल्ला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.