संदीप आचार्य

मुंबई: करोनाच्या गेल्या अडीच महिन्यात संपूर्ण जगभरातील रुग्णालयांमधील शस्त्रक्रिया जवळपास ठप्प झालेल्या असताना परळच्या ‘टाटा कॅन्सर रुग्णालयाने ‘ करोना काळातील कॅन्सर शस्त्रक्रियेसाठी नवा आदर्श निर्माण केला आहे. टाटा कॅन्सर रुग्णालयाने अवघ्या ३७ दिवसात अत्यंत गुंतागुंतीच्या व अवघड अशा तब्बल ४९४ यशस्वी शस्त्रक्रिया केल्या. विशेष म्हणजे अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठाच्या ‘अॅनल्स ऑफ सर्जरी’ या सायंटिफिक जर्नलने याची दखल घेतली आहे.

देशात करोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाल्यानंतर बहुतेक रुग्णालयातून अत्यावश्यक शस्त्रक्रिया वगळता नियमित शस्त्रक्रिया करणे जवळपास रद्द झाले. जगातील बहुतेक रुग्णालयात अशीच परिस्थिती असून या सर्वात शस्त्रक्रियेची गरज असलेल्या कॅन्सर रुग्णांची परवड मोठी आहे. इंग्लंडमधील डॉक्टरांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पुढील वर्षात शस्त्रक्रिया होऊ न शकल्याने २० हजार कॅन्सर रुग्णांचा मृत्यू होईल. या पार्श्वभूमीवर टाटा कॅन्सर रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख व उपसंचालक डॉ. शैलेश श्रीखंडे यांनी एक वेगळाच निर्णय घेतला. करोनाच्या काळातही जटील व दुर्धर शस्त्रक्रिया यशस्वीपणे करता येतात हे जगापुढे मांडण्याची भूमिका घेऊन डॉ. श्रीखंडे यांनी २३ मार्चपासून कॅन्सर रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली.

शस्त्रक्रियेसाठी रुग्णाची निवड करताना वैद्यकीय भाषेत ‘मेजर व सुप्रामेजर’ शस्त्रक्रियांची निवड केली. २३ मार्च ते ३० एप्रिल या ३७ दिवसात डॉ. शैलेश श्रीखंडे व त्यांच्या बरोबरील डॉक्टरांनी तब्बल ४९४ शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या. याशिवाय अत्यावश्यक असलेल्या २८ शस्त्रक्रियाही याच काळात केल्या. याबाबत डॉ. शैलेश श्रीखंडे यांना विचारले असता ते म्हणाले, आम्ही केलेल्या शस्त्रक्रियांमधील ६४ रुग्ण हे साठ वर्षावरील तर होतेच शिवाय त्यांना मधुमेह, रक्तदाब आदी अनेक आजार होते. जास्तीत जास्त अवघड किंवा आव्हानात्मक शस्त्रक्रियांची निवड आम्ही जाणीवपूर्वक केली. यात ७६ वर्षांच्या एका रुग्णाच्या स्वादुपिंडाची शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रिया केल्यानंतर २६ रुग्णांमधील बदल लक्षात घेऊन त्यांच्या करोना चाचण्या केल्या. यात सहा रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर करोनाची लागण झाल्याचे चाचणीत दिसून आले. अर्थात हे सर्व रुग्ण आता उत्तम असून माझे सर्व सहकारी, परिचारिका व वॉर्डबॉय यांच्या शिस्तबद्ध कामातून आम्ही यशस्वी होऊ शकलो असे डॉ. श्रीखंडे यांनी आवर्जून सांगितले.

करोना काळातील या अवघड व आव्हानात्मक कॅन्सर शस्त्रक्रिया प्रवासाचा पेपर डॉ. शैलेश श्रीखंडे यांनी अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठाच्या ‘अॅनल्स ऑफ सर्जरी’ या सायंटिफिक जर्नलला सादर केला व त्यांनीही तो तात्काळ प्रसिद्ध केला. अमेरिका तसेच युरोपमधील काही देश वगळता भारतासह बहुतेक देशात मृत्यूदर हा दहा लाख लोकांमागे ४ ते ५ एवढा आहे. अशा देशांनी योग्य काळजी घेऊन कॅन्सर शस्त्रक्रिया करण्याचा संदेश या पेपर प्रसिद्ध करण्यामागे असल्याचे डॉ. श्रीखंडे यांनी सांगितले. करोना काळातील कॅन्सर शस्त्रक्रियांचा अनुभव यातून आम्ही सादर केला आहे. यापुढे आपल्याला करोना बरोबर जगण्याची सवय करावी लागणार असल्याने कॅन्सर रुग्णांच्या शस्त्रक्रिया आता सर्वांनीच सुरु केल्या पाहिजे अशी भूमिका यात मांडल्याचे डॉ. शैलेश श्रीखंडे यांनी सांगितले.

संपूर्ण देशातील कॅन्सर रुग्णांसाठी टाटा कॅन्सर हॉस्पिटल एक जीवनदायी रुग्णालय म्हणून ओळखले जाते. ६४० खाटा असलेल्या या रुग्णालयात वर्षाकाठी ७५ हजार रुग्ण उपचारासाठी येतात. दरमहा येथे सुमारे ८०० शस्त्रक्रिया होतात तर ११ हजार रुग्णांवर केमोथेरपी केली जाते. याशिवाय काही हजार रुग्णांवर रेडिएशन पद्धतीने उपचार केले जातात. टाटा कॅन्सर रुग्णालयात एकूण तीन हजार कर्मचारी असून यात एक हजार प्रशासकीय व्यवस्था पाहातात तर उर्वरित दोन हजारात डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ आदींचा समावेश आहे. करोनाकाळात ३० टक्के कर्मचारी रोटेशन पद्धतीने कामावर येत असून अत्यावश्यक शस्त्रक्रिया वगळता सुरुवातीच्या काळात अन्य शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या होत्या. जवळपास ४० टक्केच शस्त्रक्रिया केल्या जात होत्या. हे प्रमाण वाढवता येते व रुग्ण आणि डॉक्टर- परिचारिका योग्य काळजी घेऊन शस्त्रक्रिया करता येतात हे यातून आम्हाला दाखवून देता आले, असे रुग्णालयाचे संचालक डॉ. राजन बडवे यांनी सांगितले. हे एक आव्हान होते. टाटा कॅन्सर व आमच्या डॉक्टरांसह सर्व कर्मचार्यांनी ते यशस्वीपणे पेलले आहे. हा पेपर प्रसिद्ध झाल्यानंतर भारतासह अन्य देशांसाठी एक नवा मापदंड निर्माण झाल्याचे डॉ. राजन बडवे यांनी सांगितले. यापुढे आपल्याला करोनासहच जगावे लागणार आहे. अशावेळी कॅन्सर रुग्णांच्या शस्त्रक्रिया करोनाचे कारण सांगून टाळणे योग्य राहाणार नाही तर हे आव्हान स्वीकारावेच लागेल, असे डॉ. शैलेश श्रीखंडे यांनी सांगितले.