News Flash

टाटा कॅन्सर रुग्णालयाने ४० टक्के शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या!

उपचारासाठी ऑनलाईन व टेलीफोनवर मार्गदर्शन

संग्रहित प्रतीकात्मक छायाचित्र

– संदीप आचार्य

करोना विषाणूमुळे उद्भवलेली परिस्थिती व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर परळच्या टाटा कॅन्सर रुग्णालयाने अत्यावश्यक शस्त्रक्रिया वगळता जवळपास ४० टक्के शस्त्रक्रिया व केमोथेरपी उपचार पुढे ढकलले आहेत. तसेच ज्या रुग्णांना उपचाराच्या दृष्टीने मार्गदर्शनाची आवश्यकता आहे त्यांना ऑनलाईन मार्गदर्शन मार्गदर्शन केले जाते. करोनाचा सामना करण्यासाठी येथे स्वतंत्र वॉर्डही तयार करण्यात आला असून यासाठी डॉक्टर व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे.

परळचे टाटा कॅन्सर रुग्णालय हे कर्करोगावरील उपचारासाठी देशातील सर्वोत्तम रुग्णालय असून देशभरातून कर्करोगावरील उपचारासाठी रुग्ण मोठ्या प्रमाणात येथे येत असतात. रुग्णालयात एकूण ६४० खाटा असून वर्षाकाठी सुमारे ७५,००० हून अधिक रुग्ण येथे उपचारासाठी येत असून दरमहा ८०० हून अधिक शस्त्रक्रिया कर्करुग्णांवर केल्या जातात. याशिवाय दरमहा ११,००० केमोथेरपी दिल्या जातात. तसेच रेडिएशनच्या रुग्णांची संख्याही खूप मोठी आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला ३० टक्के तातडीच्या नसलेल्या शस्त्रक्रिया व केमोथेरपी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता मुंबई राज्यातील करोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली असून सध्या तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज नसलेल्या ४० टक्के शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याचे  रुग्णालयाचे उपसंचालक व शल्यचिकित्सक विभागाचे प्रमुख डॉ शैलेश श्रीखंडे यांनी सांगितले. अमेरिकेत करोनाने हातपाय पसरल्यावर न्यू यॉर्क मधील प्रसिद्ध स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटरने त्यांच्याकडील सर्व शस्त्रक्रिया रद्द केल्या आहेत. मुंबईत जर करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले तर आम्हालाही शस्त्रक्रिया करण्याबाबत अधिक गंभीरपणे विचार करावा लागेल असे डॉ शैलेश श्रीखंडे यांनी सांगितले. तसे पाहिले तर गेल्या काही वर्षांत टाटा कॅन्सर रुग्णालयाच्या माध्यमातून देशभरात ५५ हजार डॉक्टरांना कॅन्सर उपचारासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. केवळ महाराष्टातच नव्हे तर संपूर्ण देशात कॅन्सर वरील उपचाराचे जाळे निर्माण करण्यात आले असून आम्ही शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण कमी केले असले तरी रुग्णांना ऑनलाईन व टोलिफोनिक मार्गदर्शन करत आहोत.

टाटा कॅन्सर रुग्णालयात एकूण ३,००० कर्मचारी असून यातील १,००० कर्मचारी हे प्रशासकीय काम करणारे आहेत. त्यापैकी पन्नास टक्के कर्मचाऱ्यांना सध्या सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरित २००० लोक ज्यात डॉक्टर, परिचारिका,तंत्रज्ञ आदींपैकी  ३० टक्के लोकांना रोटेशन पद्धतीने कामावर येण्याची रचना करण्यात आली आहे. मी स्वत: तीन दिवस घरातून काम करतो तर उर्वरित दिवस रुग्णालयात येऊन रुग्णांच्या शस्त्रक्रिया करतो. गेल्या आठवड्यात सात शस्त्रक्रिया केल्याचे डॉ श्रीखंडे यांनी सांगितले. मुंबईबाहेरच्या तसेच अन्य राज्यातील रुग्णांना उपचारासाठी ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात येत असून त्यांच्या जवळच्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचाराची व्यवस्था होऊ शकते.  करोनाचे रुग्ण वाढल्यास तसेच एखाद्या कॅन्सर रुग्णाला करोना झाल्यास त्याचा विचार करून स्वतंत्र वॉर्ड आमच्याकडे तयार करण्यात आला आहे. तसेच रुग्ण व्यवस्थापन व डॉक्टरांना प्रशिक्षणही देण्यात आल्याचे डॉ श्रीखंडे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2020 9:46 am

Web Title: tata cancer hospital postpones 40 per cent operations
टॅग : Coronavirus
Next Stories
1 नवी मुंबईत करोनामुळे एकाचा मृत्यू; नेरूळमध्ये तरुणाला संसर्ग
2 एक हजार कर्मचाऱ्यांची अ‍ॅण्टिबॉडी चाचणी
3 प्रतिबंधित क्षेत्रासाठी पालिकेची कार्यपद्धती
Just Now!
X