रविवारची सकाळ ही सहसा सुस्त आणि आरामाची सकाळ असते. पण, २१ जानेवारीच्या या दिवशी सूर्याची पहिली किरणं डोक्यावर येण्यापूर्वीच धावपळ करणारं हे मुंबई शहर जागं झालं. सुट्टीच्या दिवशी इतक्या पहाटे या शहराला जाग येण्याचं कारण होतं ‘मुंबई मॅरेथॉन’. ‘टाटा मुंबई मॅरेथॉन’ला सुरुवात झाली आणि सर्व विभागातील शर्यतींचे निकाल हाती आले. या संपूर्ण मॅरेथॉनध्ये इथिओपियाच्या धावपटूंचं वर्चस्व पाहायला मिळालं. त्यासोबतच महाराष्ट्राचा झेंडाही या शर्यतीमध्ये चांगलाच दिमाखात फडकला.

महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या हाफ मॅरेथॉनमध्ये नाशिकच्या मुलींनी मारली बाजी. ज्यामध्ये नाशिकची संजीवनी जाधव हिने पहिला क्रमांक पटकावला, तर मोनिका आथरे ही दुसऱ्या स्थानावर राहिली. महाराष्ट्राचं नाव मुंबई मॅरेथॉनमध्ये गाजवणाऱ्या या मुलींशिवाय सैन्यदलाचा प्रभावही या शर्यतीमध्ये पाहायला मिळाला. ज्यामध्ये सेना दलातील प्रदीप कुमार सिंग चौधरी, शंकरलाल थापा आणि दीपक कुंभार या धावपटूंनी अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला.

वाचा : Mumbai Marathon Live : इथिओपिआचा सोल्मन डेक्सिस ठरला विजेता

मुंबई मॅरेथॉनमध्ये फक्त धावपटूच नव्हे तर सर्वसामान्य मुंबईकर आणि कलाकारांचाही सहभाग पाहायला मिळाला. ड्रीम रनमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाचा उत्साह ओसंडून वाहात होता. ज्यामध्ये अभिनेता मिलिंद सोमण, अभिनेत्री मंदिरा बेदी, काजल अग्रवाल, तारा शर्मा यांच्या समावेश होता. त्यांच्याशिवाय इतरही कलाकार मंडळींसुद्धा या धावत्या उत्साहाचा एक भाग झाल्याचं पाहायला मिळालं.