हॅचबॅक श्रेणीत सलग तीन वर्षांपासून सर्वाधिक विश्वसनीय ब्रॅण्ड म्हणून गणल्या गेलेल्या टाटा नॅनोच्या नव्या रूपाचे दणदणीत स्वागत झाले आहे. आठवडाभरापूर्वीच बाजारात सादर करण्यात आलेल्या ‘जेनएक्स’ या टाटा नॅनोच्या नव्या गाडीचे वितरणही सुरू झाले आहे. पुण्यात एका समारंभात ३५ ग्राहकांना जनएक्सच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी टाटा मोटर्सच्या पॅसेंजर व्हेइकल्स बिझनेस युनिटचे वरिष्ठ उपाध्यक्ष गिरीश वाघ यांच्यासह पंडित ऑटोमोटिव्ह प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक विजय गोखले व संचालक चंद्रशेखर लाटकर उपस्थित होते.
दोन वर्षांनंतर टाटांनी नॅनोचे नवे रूप सादर केले आहे. ६२४ सीसी क्षमतेच्या नव्या नॅनोमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशन आणि इझी शिफ्ट असे दोन व्हेरिएंट्स उपलब्ध आहेत. पुण्यात झालेल्या समारंभात १७ ग्राहकांना मॅन्युअल ट्रान्समिशनच्या तर उर्वरित ग्राहकांना इझी शिफ्टच्या टॉप एन्ड व्हेरिएंट वितरित करण्यात आल्या. इझी शिफ्ट व्हेरिएंटमध्ये चालकाला गाडी चालवताना फारसा ताण पडू नये अशी रचना करण्यात आली आहे. वाहतूककोंडीत अडकल्यास गाडीच्या ब्रेक पॅडलवरील पाय काढला तरी गाडी पुढे सरकू शकेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूककोंडीत सारखे गीअर बदलण्याचा त्रास होत नाही. तसेच मॅन्युअल मोडमधून ऑटोमॅटिक गीअरमध्ये रूपांतरण करण्याची सुविधाही जनएक्समध्ये देण्यात आली आहे.
गाडीच्या आतील बाजूला स्पेसही भरपूर आहे. लगेज स्पेसही देण्यात आली आहे. ब्लूटूथ, सीडी, रेडिओ, यूएसबी आणि ऑक्झ-इन या अत्याधुनिक सोयीसुविधाही जनएक्समध्ये अंतर्भूत आहेत. त्यामुळेच एक परिपूर्ण अशी स्मार्ट सिटी कार असे तिचे नामकरण करण्यात आले आहे. नवी नॅनो प्रति लिटर २१ ते २३ किलोमीटर प्रवास देते. नव्या गाडीत इंधन साठवणूक क्षमता २४ लिटपर्यंत वाढविण्यात आली आहे.