मुंबईत मंगळवारी वीजसंच बंद पडून निर्माण झालेल्या वीजसंकटाच्या पाश्र्वभूमीवर ‘टाटा पॉवर कंपनी’ने आता मुंबईत विजेची उपलब्धता वाढवायची तर तेल-वायूवर चालणारा ५०० मेगावॉटचा वीजसंच कोळशावर सुरू करण्याच्या मागणीचे घोडे पुन्हा पुढे दामटले आहे. राजकीय सहमती झाली तरच हा वीजसंच कोळशावर सुरू करून मुंबईसाठी जादा वीज उपलब्ध करून देता येईल, असा पवित्रा ‘टाटा पॉवर’ने घेतला आहे.
मुंबईत मंगळवारी ‘टाटा पॉवर’चा ५०० मेगावॉटचा वीजसंच बंद पडला व सकाळी पावणे दहा वाजल्यापासून रात्री दोनपर्यंत दक्षिण मुंबईतील मोठा भाग आणि उपनगरात अनेक ठिकाणी अंधार पसरला. त्यावरून बराच गदारोळ झाला. या पाश्र्वभूमीवर ‘टाटा पॉवर’चे व्यवस्थापकीय संचालक अनिल सरदाना यांनी बुधवारी दुपारी अचानक पत्रकार परिषद घेत, मुंबईतील विजेची उपलब्धता वाढवण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या संचांचा पुरेपूर वापर झाला पाहिजे. त्यासाठी ५०० मेगावॉटच्या तेलावर चालणाऱ्या संचाला कोळशावर चालवण्याची परवानगी मिळायला हवी, असा सूर लावला. तेलावरील वीजनिर्मिती प्रतियुनिट १२ ते १४ रुपये इतकी महाग ठरते. या उलट कोळशावरील वीजनिर्मिती प्रतियुनिट अवघ्या चार रुपयात होते. तसे झाल्यास मुंबईकरांना आणखी ५०० मेगावॉट वीज उपलब्ध होईल, असे सरदाना यांनी नमूद केले.
‘टाटा पॉवर कंपनी’च्या ट्रॉम्बे येथील वीजप्रकल्पात ५०० मेगावॉटचा तेल किंवा वायूवर चालणारा जुना संच आहे. या वीजसंचाचे नूतनीकरण करून तो कोळशावर सुरू करण्याचा ‘टाटा पॉवर’चा प्रस्ताव आहे. त्यासाठी पर्यावरण परवानगी मिळाली आहे. मात्र, शिवसेनेसह अनेक स्थानिक स्वयंसेवी संस्थांनी त्यास विरोध केला आहे. कोळशावर वीजसंच सुरू झाला तर चेंबूर, माहुल आदी वीजप्रकल्पाच्या लगतच्या भागात लोकांना राखेचा त्रास होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.
‘बेस्ट’चा वीज आयोगात जाण्याचा इशारा..
‘टाटा पॉवर’ने वीज पुरवण्यासाठी ‘बेस्ट’सह करार केला आहे. वीजप्रकल्प कार्यक्षमतेने चालवणे ही ‘टाटा पॉवर’ची जबाबदारी आहे. ‘टाटा पॉवर’ने मंगळवारी तेलावर चालणाऱ्या वीजसंचातील विजेपोटी जादा दर लावला तर ‘बेस्ट’ त्यास राज्य वीज नियामक आयोगात आव्हान देईल. तसेच अडचणीच्या वेळी मुंबईत बाहेरून वीज आणण्यासाठी पारेषण यंत्रणा सज्ज ठेवण्याची जबाबदारीही ‘टाटा’ची आहे, अशी भूमिका ‘बेस्ट’चे महाव्यवस्थापक ओ. पी. गुप्ता यांनी जाहीर केली आहे.