पावसाळ्यात वीजपुरवठय़ात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आणि तक्रारींची दखल घेण्यासाठी ‘टाटा पॉवर’ सज्ज झाली आहे. कंपनीच्या २४ तास चालणाऱ्या मदत केंद्रांमध्ये १८००२०९५१६१ ग्राहक तक्रार करू शकतील किंवा ०२२-२५७७४३९९ या क्रमांकावरही ग्राहकांना संपर्क साधता येणार आहे.

वीज उपकेंद्रांची मान्सूनपूर्व तपासणी, उपकरणांची देखरेख, पाणी गळती आणि पाणी साचणे यासाठीचे प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आले आहेत. उपकेंद्रांमध्ये पाण्याचा उपसा करणारे पंपही बसविण्यात आले आहेत. समस्येचे निवारण करण्यासाठी शहरात विविध ठिकाणी अभियंत्यांची पथके तैनात करण्यात आली आहेत. पावसाळ्याच्या दिवसात वीजपुरवठय़ासंदर्भात काही समस्या निर्माण झाली तर त्याची सोडवणूक करण्यासाठी सर्व जय्यत तयारी करण्यात आली आहे, असे  टाटा पॉवरचे कार्यकारी संचालक अशोक सेठी यांनी सांगितले.

इमारतीच्या केबीनमध्ये पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी, इलेक्ट्रॉनिक वायरिंगची तपासणी करून घ्यावी, मीटर केबीन, वितरण खांब यातून ठिणग्या येत असल्याचे किंवा शॉक लागतअसल्याचे लक्षात आले तर टाटा पॉवरच्या १८००२०९५१६१ या कॉल सेंटरवर संपर्क साधावा, असे आवाहनही टाटा पॉवरने केले आहे.