२१ मेपासून वीज विक्री थांबवण्याचा ‘टाटा पॉवर’चा इशारा

मुंबई शहरात वीजपुरवठा करणाऱ्या बेस्ट उपक्रमाने टाटा वीज कंपनीकडून खरेदी केलेल्या विजेचे तब्बल ५६१.५८ कोटी रुपये थकविले असून गेल्या पाच महिन्यांमध्ये एक छदामही न दिल्यामुळे टाटा वीज कंपनीने बेस्ट उपक्रमाला नोटीस पाठविली आहे. तातडीने या पैशांचा भरणा न केल्यास येत्या २१ मेपासून विजेची विक्री न करण्याचा इशाराही टाटा वीज कंपनीने दिला आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमासमोर आणखी एक नवे संकट उभे राहिले असून मुंबई शहर २१ मेच्या मध्यरात्रीपासून अंधारात बुडण्याची भीती निर्माण झाली आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये बेस्ट उपक्रमाचा तोटा वाढत असून उपक्रमाचा आर्थिक डोलारा डळमळीत झाला आहे. कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी कर्ज काढण्याची वेळ बेस्ट उपक्रमावर ओढवली आहे. वेतन वेळेवर मिळत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होऊ लागला आहे. कामगार संघटनांनीही याविरोधात ओरड सुरू केली आहे. तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटीची रक्कम देणेही बेस्टला शक्य झालेले नाही. आर्थिक समस्येमुळे बेजार झालेल्या बेस्ट उपक्रमाच्या संकटात आता आणखी भर पडली आहे.

टाटा वीज कंपनीकडून वीज खरेदी करून बेस्ट उपक्रम मुंबई शहराला वीजपुरवठा करते. वीज खरेदीसाठी टाटा वीज कंपनी आणि बेस्ट उपक्रमामध्ये करार करण्यात आला आहे. बेस्ट उपक्रमाच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे डिसेंबर २०१८ पासून एप्रिल २०१९ पर्यंतच्या काळात खरेदी केलेल्या विजेचे पैसे टाटा वीज कंपनीला देता आलेले नाहीत. वीज खरेदीपोटी टाटा कंपनीला बेस्ट उपक्रम तब्बल ५६१ कोटी ५८ लाख रुपये देणे लागत आहे. थकबाकीची रक्कम वाढतच असल्यामुळे टाटा वीज कंपनीने बेस्ट उपक्रमाला पत्र पाठवून पैसे देण्याची सूचना केली आहे. मात्र आजतागायत बेस्ट उपक्रमाने टाटा वीज कंपनीला पैसे अदा केलेले नाहीत. त्यामुळे टाटा वीज कंपनीने बेस्ट उपक्रमाला नोटीस पाठवून थकीत पैशांची मागणी केली आहे. थकबाकीची रक्कम नियोजित वेळेत न भरल्यास येत्या २१ मे रोजी मध्यरात्रीपासूून बेस्ट उपक्रमाला विजेची विक्री करण्यात येणार नाही, असे या नोटीसमध्ये टाटा वीज कंपनीने स्पष्ट केले ओह. उभयतांमध्ये झालेल्या वीज खरेदी करारातील कलमान्वये ही कारवाई करण्यात येईल. त्यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीस टाटा वीज कंपनी जबाबदार नसेल, असेही या नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

बेस्टने थकविलेली रक्कम (रुपये कोटींमध्ये)

महिना     थकीत रक्कम

डिसेंबर २०१८    ११२.२४

जानेवारी २०१९   ८८.०६

फेब्रुवारी २०१९    १०८.४७

मार्च १०१९      ११६.९०

एप्रिल २०१९      १३५.९०

एकूण           ५६१.५८

खरेदी करण्यात येणाऱ्या विजेचे पैसे टाटा कंपनीला वेळोवेळी भरण्यात येतात. याबाबत पाठपुरावा करण्यात येत असून लवकरच पैसे भरण्यात येतील.

– आर. जे. सिंह, उपमहाव्यवस्थापक, विद्युत पुरवठा, बेस्ट उपक्रम