29 September 2020

News Flash

प्रकाश प्रदूषणावर ‘डाऊन लाइट’ची मात्रा

‘टाटा मूलभूत विज्ञान संशोधन संस्थे’च्या आवारात ‘डाऊन लाइट’ बसविण्यात आले आहेत.

‘टाटा मूलभूत विज्ञान संशोधन संस्थे’च्या आवारात ‘डाऊन लाइट’ बसविण्यात आले आहेत.

टाटा संस्थेमधील पहिला प्रयोग
मुंबई शहरात ध्वनी, पाणी आणि वायुप्रदूषणाबरोबरच प्रकाश प्रदूषणाचा प्रश्नही मोठय़ा प्रमाणावर भेडसावू लागला आहे. या प्रश्नावर मात करण्यासाठी कुलाबा येथील ‘टाटा मूलभूत विज्ञान संशोधन संस्थे’च्या आवारात ‘डाऊन लाइट’ बसविण्यात आले आहेत. या दिव्यांमधून येणारा प्रकाश हा केवळ खालीच परावर्तित होतो. तो वरच्या दिशेला जात नसल्यामुळे प्रकाश प्रदूषण कमी होण्यास मदत होते. असा प्रयोग शहरातील पथदिव्यांच्या बाबतीत झाल्यास रात्रीचे प्रकाश प्रदूषणविरहित आकाश अनुभवता येणार असल्याचा दावा येथील जाणकारांनी केला आहे.
मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, ठाणे, औरंगाबाद राज्यातील या महानगरांसह अन्य महानगरांतही हल्ली मोठय़ा प्रमाणावर दिव्यांमुळे प्रकाशाचे प्रदूषण होत आहे. इमारतींमधील दिवे, पथदिवे, वाहने तसेच दुकानांचे दिवे यामुळे हे प्रदूषण होते. त्यामुळे रात्री निवांतपणा अनुभवण्यासाठी आकाशाकडे नजर टाकणाऱ्या सामान्यांनाही रात्रीचे काळेभोर आकाश दिसण्याऐवजी प्रकाशमयच दिसते. यात, वायुप्रदूषणानेदेखील भर घातली आहे. यावर मात करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या पण वैज्ञानिक हेतूने आजवर वापर न झालेल्या ‘डाऊन लाइट’चा वापर करण्याचा प्रयोग ‘टाटा मूलभूत विज्ञान संशोधन संस्थे’ने केला आहे. यामागे वैज्ञानिक हेतू असून संस्थेच्या आवारात मोठय़ा प्रमाणावर पक्षी आहेत. यात अनेक स्थलांतरित पक्षीदेखील असून प्रजोत्पादनासाठी हे पक्षी संस्थेच्या आवारातील झाडांचा आसरा घेतात. या वेळी त्यांच्या प्रजोत्पादनाच्या प्रक्रियेवर येथील रात्रीच्या प्रकाशाचा परिणाम होत आहे. त्यामुळे जर रात्रीचा प्रकाश वर आकाशाच्या दिशेने फेकलाच गेला नाही, तर या प्रकाशाचा त्रास या पक्ष्यांना होणार नाही. त्यामुळे, प्रकाशाचा झोत खालीच पडेल यासाठी या ‘डाऊन लाइट’चा वापर करण्याचा प्रयोग केला. यात काही किरकोळ बदल करून भविष्यात संस्थेतील सर्वच दिवे या स्वरूपाचे लावण्याचा मानस असल्याचे संस्थेतील एका वैज्ञानिकाने सांगितले.

‘डाऊन लाइट’ म्हणजे?
प्रकाश देणारे पथदिवे सामन्यत: ऊध्र्वगामी असून त्यांचा प्रकाश सभोवताली पडताना वरही फेकला जातो. मात्र डाऊन लाइट्स हे एलईडी दिव्यांचे असून ते प्रकाशाचा झोत फक्त खालच्या दिशेने फेकतात. तसेच त्यांना वरील बाजूस झाकण्यासाठी गोल थाळीवजा भागही असतो त्यामुळे प्रकाश आकाशाकडे जात नाही. वेगवेगळ्या रचनांचे तसेच आकारांचे पथदिव्यांसारखे हे दिवे बाजारात उपलब्ध आहेत.
शहरी पथदिव्यांना पर्याय
शहरातील पथदिव्यांऐवजी असे दिवे बसवल्यास मोठय़ा प्रमाणावर प्रकाश प्रदूषणाला आळा बसू शकतो. यासाठी पथदिव्यांबाबतीत थोडे संशोधन व काही रचनात्मक बदल केल्यास शहरातील सध्याच्या पथदिव्यांना हे दिवे चांगले पर्याय ठरू शकतात, असे मत काही जाणकारांनी नोंदविले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2016 12:50 am

Web Title: tata science research center step against light pollution
Next Stories
1 सौरविजेची मुहूर्तमेढ माटुंगा रोड स्थानकातून
2 जोगेश्वरी उड्डाणपूल महिनाअखेरीस खुला
3 पोलीस दलात चालकांची वानवा
Just Now!
X