News Flash

टाटा स्कायचा ‘झी’ला टाटा?

प्रक्षेपण करार संपत आल्याने प्रेक्षक चिंताग्रस्त

टाटा स्कायचा ‘झी’ला टाटा?
( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

प्रक्षेपण करार संपत आल्याने प्रेक्षक चिंताग्रस्त

टाटा स्काय डीटीएच आणि झी ‘झी एन्टरटेनमेंट एन्टरप्राइज लिमिटेड’ यांच्यातील प्रक्षेपण करार संपत आल्याने १४ सप्टेंबरपासून ‘झी’च्या काही वाहिन्या न दिसण्याची शक्यता आहे.

टाटा स्कायने याची सूचना जाहिरातीद्वारे ग्राहकांना दिली आहे. शिवाय त्याबद्दलची नोटीसही झी एन्टरटेनमेंट एन्टरप्राइज लिमिटेडला पाठवण्यात आली आहे. ‘झी’च्या काही वाहिन्या पाहता येणार नसल्याने ग्राहकांनी टाटा स्कायकडे विचारणा सुरू केली आहे. त्याबद्दल झीने मात्र कार्यवाही केली नसल्याचे समजते.

टाटा स्कायच्या जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे झी २४ तास, झी टॉकीज, झी युवा, झी टीव्ही (एचडी), अ‍ॅण्ड टीव्ही (एचडी), झी सिनेमा (एचडी), झिंग, झी न्यूज, झी अनमोल, झी बिझनेस, लिव्हिंग फूड्ज याचबरोबर झी समूहाच्या अन्य काही प्रादेशिक आणि ३३ हिंदी वाहिन्यांबरोबरचा प्रक्षेपण करार संपुष्टात आला आहे. बातम्या, चित्रपट, दैनंदिन कार्यक्रम, हिंदी गाणी यांना वाहिलेल्या ‘झी’च्या काही वाहिन्या टाटा स्कायच्या ग्राहकांना १४ सप्टेंबरपासून पाहता येतील की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. केबल वितरण सेवा पुरवणाऱ्या डीटीएच सेवांमध्ये टाटा स्कायचा वाटा २५ टक्के आहे. नव्या वाहिन्यांची संख्या वाढत असल्याच्या पाश्र्वभूमीवर टाटा स्कायचे वाहिन्यांचे प्रक्षेपण न करण्याचे हे पाऊल ग्राहकांसाठी चिंतेचा विषय ठरले आहे.

टाटा स्कायने झीशी पुन्हा करार करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ‘ट्राय’च्या नियमानुसार ग्राहकांना माहिती मिळावी यासाठी टाटा स्कायने एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीत झीच्या कुठल्या वाहिन्या १४ सप्टेंबर २०१८ पासून टाटा स्कायच्या ग्राहकांना पाहता येणार नाहीत त्यांची नावे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. अशा प्रकारच्या करारानुसार वाहिन्यांचे प्रक्षेपण थांबवले जाण्याची शक्यता अत्यंत कमी म्हणजे १ टक्का असते.

कारण जाहिरात प्रसिद्ध करताना २१ दिवसांचा कालावधी दिलेला असतो. त्या कालावधीत वाहिन्यांचे समूह तो करार पुन्हा करतात आणि वाहिन्या दाखवण्यास संमती देतात. त्यामुळे कुठल्याही प्रकारे त्या वाहिन्यांचे प्रक्षेपण आम्ही थांबवत नाही, असे टाटा स्कायने स्पष्ट केले. झी समूह पुन्हा करार करण्यासाठी दिलेल्या वेळेत आपली बाजू स्पष्ट करेल आणि वाहिन्यांचे प्रक्षेपण रोखण्याची वेळ येणार नाही, अशी आशाही टाटा स्कायने व्यक्त केली. याविषयी झी एन्टरटेन्मेंट एन्टरप्राइज लिमिटेडची प्रतिक्रिया प्रयत्न करूनही मिळू शकली नाही.

करार कशासाठी?

प्रत्येक डीटीएच कंपनीला प्रत्येक वाहिनीमागे काही ठरावीक रक्कम मोजावी लागते. प्रत्येक वाहिनीच्या टीआरपीच्या कमी-जास्त आकडेवारीनुसार, लोकप्रियतेनुसार एक किंमत ठरवलेली असते. त्यानुसार कुठल्या वाहिन्या दाखवायच्या याविषयी केबल सेवा पुरवणाऱ्या कंपन्या आणि वाहिन्यांच्या समूहाशी (उदाहरणार्थ, झी ग्रुप, स्टार ग्रुप, सोनी ग्रुप इत्यादी) करार करतात. यामध्ये कुठल्या वाहिन्या केबलद्वारे दाखवल्या जाणार आहेत, त्यांची नावे, त्यासाठी आकारलेले शुल्क आणि कराराच्या कालावधीचाही त्यात उल्लेख असतो. असाच करार टाटा स्काय आणि झीमध्ये झाला होता.

ग्राहकांना माहिती

व्हिडीओकॉन डीटूएच, हॅथवे, डेन, टाटा स्काय, झी डीश टीव्ही अशा केबल सेवा पुरवणाऱ्या कंपन्या आणि वाहिन्यांचे समूह यांमध्ये पे चॅनेल्ससाठी करार होत असतात. अशा वेळी ट्रायच्या नियमांचे पालन करण्यासाठी केबल कंपन्या आणि वाहिन्यांचे समूह जाहिरात प्रसिद्ध करून आणि कार्यक्रम प्रसारणाच्या वेळी टीव्ही स्क्रीनवर सूचना देऊ न आपापल्या ग्राहकांना याविषयी माहिती देत असतात. आता टाटा स्कायच्या सूचनेप्रमाणे ‘झी’ने टाटा स्कायशी पुन्हा करार न केल्यास टाटा स्कायच्या ग्राहकांना झीच्या काही वाहिन्या पाहता येणार नाहीत.

‘झी’चे वेगळे पाऊल?

१४ सप्टेंबरपासून ऐन गणेशोत्सव काळात झीच्या वाहिन्या पाहू शकू की नाही, याबद्दल टाटा स्कायचे ग्राहक चिंतेत असून ते टाटा स्कायच्या कार्यालयात दूरध्वनी करून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. झी एन्टरटेन्मेंट एन्टरप्राइज लिमिटेडने अलीकडेच आपल्या सर्व वाहिन्या पे चॅनलमध्ये रूपांतरित केल्यामुळे झी समूह दूरचित्रवाणीच्या माध्यमातून काही वेगळी पावले उचलत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2018 2:13 am

Web Title: tata sky zee entertainment
Next Stories
1 कार-दुचाकी खरेदी खर्चीक
2 सरकारकडून परदेशांत इंधनाची स्वस्तात विक्री
3 अर्थवेग झोकात!
Just Now!
X