शास्त्रीय संगीताचे संस्कार कानांवर होत असले तरीही त्यापेक्षा वेगळे काही करण्याची एक उपजतच आवड मला होती. शिक्षणातील माझी एकूणच गती पाहता अखेरीस बाराव्या वर्षी अब्बाजींचा अधिकृतपणे गंडाशागीर्द झालो. शास्त्रोक्त बोल शिकतानाच मला दुसरीकडे बर्मनदांचे ड्रम्ससाऊंड भूरळ घालत होते. समोर दिसणारया प्रत्येक सपाट पृष्ठभागातून येणारे नानाविध नाद निर्माण करण्याचा जणू मला छंदच लागला होता. शास्त्राच्या ठराविक मर्यादेत आणि चौकटीत राहून तालाचा जेव्हा छंद होतो तेव्हा ती कला होते, असे साधारणपणे सांगितले जाते. मला मात्र आधी छंद दिसतो आणि मग तिथून तालाकडे माझा प्रवास होतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ तालवाद्यकार तौफिक कुरेशी यांनी नुकतेच मुंबईत गोरेगाव येथे बोलताना केले.

अभ्यासात जेमतेम असलेल्या आपणाकडून आईच्या असलेल्या अपेक्षा, अब्बाजींनी आपल्यातल्या कलाकाराला घातलेले खतपाणी, वेळोवेळी दिलेली समज, शिकवण या साऱ्याचा परिपाक आजचा तौफिक घडण्यात झाला असे त्यांनी सांगितले. प्रामाणिकपणा, मेहनत आणि नियमित रियाज यांच्याबरोबरीनेच चौकटीपल्याडच्या नवनव्या क्षितिजांना शोधाल तेव्हाच आयुष्यात पुढे जाल, हा अब्बाजींनी दिलेला मूलमंत्रच मी जपत आलो आहे, अशा शब्दांत आपल्या यशाचे रहस्य तौफिकजींनी उघड केले.

फ्युजनविषयी बोलताना तौफिकजी म्हणाले, की ज्यांच्यासोबत तुम्ही वाद्यसंगत करता आहात, त्यांच्या कलेचे तंत्र, शैली तुम्हाला माहित असायला हवी. ते समजून घेत त्यांच्याशी एकरूप होत एकसंध संगीतरूप तयार करणे म्हणजे फ्युजन. ज्यांच्या संगीतासोबत साथ करायची त्यांच्यासारखंच होऊन जायचं, हे मी अब्बाजी आणि झाकीरभाईंकडून शिकलो आहे. ज्येष्ठ संतूरवादक पं. शिवकुमार शर्माजींनी जेव्हा माझं तालवादन ऐकले त्यावेळेस ते म्हणाले होते, की अब्बाजींच्या विद्य्ोला नवं रूप देऊन अनेक विद्यार्थ्यांसाठी अगणित वाटा तू निर्माण केल्या आहेस. ही माझ्यासाठी मोठीच कौतुकाची थाप आहे. चित्रपटांसाठी संगीत करतानाही त्या प्रसंगातील ध्वनीची अपेक्षा आधी ऐकण्याचा आणि संगीतात, वाद्यातून तर कधी आवाजातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळेच ‘बूमरो बूमरो’ गाण्यातील ब्रासइफेक्ट, ‘मेरे ढोलना’ गीतामधील तालांचे बोल अशा वेगवेगळ्या सृजनात्मक गोष्टी त्या त्या संगीतकारांनी  मला दिलेल्या स्वातंत्र्यामुळे साध्य करू शकलो.

आज मला जे जमतं आहे, ते विद्यार्थ्यांना जमेलच असे नाही. ते वेगळा विचार करणारेही असतील. नपेक्षा त्यांनी तो करावाच, तरच विद्या अधिकाधिक प्रयोगांनी समृद्ध होत जाते. जे मी माझ्या अब्बाजींकडून शिकलो, त्यात माझ्या सृजनाची, कल्पकतेची भर घालत वेगळे काही करायचा प्रयत्न केला. ते करीत असताना अब्बाजींची झलकही दिसेल, हेही पाहिलं. विद्यार्थ्यांना ढोल, ढोलक, ड्रम शिकवतानाही शास्त्रोक्तचा हट्ट धरण्यापेक्षा जे त्यांच्या ओळखीचे आहे त्यापासून सुरूवात करत शास्त्रापर्यंत त्यांना नेण्याकडे माझा कल राहिला आहे. यामुळेच संगीताबद्दलची युवा पिढीची रूची वाढताना, त्यात नवनवीन प्रयोग करू पाहण्याची वृत्ती वाढताना पाहिली की समाधान वाटते, असेही तौफिकजी म्हणाले.

आपल्या या तालप्रवासाची झलकही त्यांनी यावेळी रसिकांना ऐकवली. भांगडा, लेझीम, भजनी ठेका हे सुपरिचित ताल आणि त्यातून तौफिकजींनी निर्मित केलेला अनुक्रमे ‘कायदा’, ‘उठान’, ‘चक्रधार’मधील’ताल ‘ाांचे प्रात्यक्षिक ऐकताना रसिक अवाकझाले. रंगलेल्या या गप्पांच्या अखेरीस आफ्रिकन वाद्य ‘झेंबे’ आणि क्युबाचे तालवाद्य काहोन बॉक्स यांचे सादरीकरण त्यांनी केले. यावेळी तौफिकजींना त्यांचाच विद्यार्थी दीपेश वर्मा याने काहोन बॉक्स वादनात साथ केली.