आठवडय़ाची मुलाखत : संजीव वल्सन

तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्याने मुंबईतील शेकडो झाडे उन्मळून पडली. रस्त्यांवर, गृहसंकुलांच्या आवारात पडलेल्या झाडांचे तुकडे करून ते हटवण्याचे काम वेगात करण्यात आले. मात्र, ‘ही झाडे उन्मळून पडली असली तरी मेलेली नाहीत’ असे सांगून ‘रिवायल्डिंग आरे’ या मोहिमेने झाडांचे पुनरेपण करण्यासाठी पुढाकार घेतला. त्या निमित्ताने मुंबईत वृक्ष पुनर्रोपणाचा प्रयोग झाला. झाडे जगवण्यासाठी सगळ्यांनीच पुढाकार घेतला तर नैसर्गिक आपत्तीत उन्मळून पडलेली शेकडो झाडे आपण वाचवू शकतो, असे या संस्थेचे म्हणणे आहे. महापालिकेनेही याची दाखल घेत झाडे वाचवण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. उन्मळून पडलेल्या झाडांना नवा जन्म देणाऱ्या या संस्थेचे प्रमुख संजीव वल्सन यांच्याशी के लेली ही बातचीत.. ’ पुनर्रोपण संकल्पनेमागची भूमिका काय?
चक्रीवादळामुळे केवळ मुंबईतच आठशेहून अधिक झाडे उन्मळून पडली. या बातमीने आम्ही हेलावून गेलो. झाडे पडलेल्या ठिकाणांना भेट दिली तर तिथे पालिकेचे कंत्राटदार झाडांचे तुकडे करून रस्ते मोकळे करत होते. झाडांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यांना जगवले पाहिजे हा एकमेव विचार डोक्यात होता. त्यादृष्टीने आम्ही कृती करायला सुरुवात केली आणि पुनर्रोपणाचा पर्याय शोधला. झाडे केवळ उन्मळून पडली आहेत, त्यांना जीवदान दिले तर ती वाचू शकतात हा विचार घेऊन ‘पुनर्रोपण’ मोहीम उभारली. सुरुवातीला पुनरेपण संकल्पनेबाबत आम्ही विचारणा सुरू केली तेव्हा लोकांनी आमच्या मनात अनेक गैरसमज निर्माण केले. याला लाखोंचा खर्च येतो, यासाठी महागडी यंत्रे लागतात, हे शक्य नाही असेच अभिप्राय मिळत होते. पण आम्ही अधिक माहिती घेत तज्ज्ञांपर्यंत पोहोचलो. सुरुवातीला हैद्राबादमधील उद्यानशास्त्र तज्ज्ञ उदय कृष्णन यांनी मार्गदर्शन केले. मग मुंबईतील रोशनी शहा यांनी सहकार्य केले. सध्या उद्यानशास्त्र तज्ज्ञ विनोद मोहिते यांच्या उपस्थितीत पुनर्रोपण सुरू आहे. झाडे कशी लावावी, ती लावताना काय काळजी घ्यावी याचे प्रशिक्षण घेऊन कार्यकर्ते काम करत आहेत.

’ झाडे उन्मळण्याची काय कारणे असतात?
मुंबईतील झाडांभोवती मोठय़ा प्रमाणात बांधकाम केले जाते. कधी पालिकेकडून तर कधी गृहसंस्थांकडून झाडांभोवती किंवा आसपासच्या भागात लाद्या, टाइल्स, सिमेंट काँक्रीटचे बांधकाम केल्याने मुळांची वाढ थांबते. कधी मुळे कुजतात, कीड लागते. परिणामी मुळे कमकुवत झाल्याने झाडांचा आधार निघून जातो. बऱ्याचदा झाडांच्या गुणधर्मानुसार त्यांची लागवड होत नाही. त्यामुळे ती उन्मळून पडतात. त्यामुळे बांधकामापूर्वी नागरिकांनी विचार करायला हवा.

’ पुनर्रोपणची प्रक्रिया काय आहे?
उन्मळून पडलेले प्रत्येकच झाड आपण वाचवू शकतो, असे नाही. त्यासाठी झाड देशी आहे की विदेशी, त्याची मुळे कशी आहेत, झाडाला दुखापत किती झाली आहे याची पाहणी करून पुनरेपणाबाबत निर्णय घेतला जातो. पडलेल्या झाडाचा परिसर पुनरेपणासाठी योग्य असेल तर ठीक, अन्यथा दुसरी जागा शोधावी लागते. त्या जागेची अधिकृत परवानगी मिळाल्यानंतर झाडाचा आकार लक्षात घेऊन खड्डा खणला जातो. त्यासाठी जेसीबी वापरला जातो. तर झाड उचलण्यासाठी क्रेनचा वापर होतो. कटरच्या साहाय्याने अनावश्यक फांद्या काढल्या जातात, तर रोपणापूर्वी झाडांना औषधे लावावी लागतात. बुरशी लागू नये, कीड लागू नये आणि मुळांची वाढ व्हावी अशी तीन औषधे देऊन झाडांचे पुनरेपण केले जाते. हे करताना झाडांना इजा होणार नाही, दुखापत होणार नाही, याची काळजी घेतली जाते. तसेच पुढे काही आठवडे झाडांना नियमित पाणी देणे, प्रकृती तपासणे हे देखील करावे लागते.

’ या प्रक्रियेसाठी येणारा खर्च किती?
झाडांच्या रोपणासाठी लागणारी यंत्रे आणण्यातच सर्वाधिक खर्च आहे. तसेच औषधांसाठीही काही रुपये लागतात. पण नियोजन आखून काम केले तर एका झाडाचे ६ ते ८ हजार रुपयांत पुनरेपण करता येते. यासाठी लागणाऱ्या जेसीबी, क्रेन आणि कटर हे दिवसाच्या भाडेतत्त्वावर आणावे लागतात. एका यंत्रासाठी ८ ते १२ हजार रुपये याप्रमाणे तीन यंत्रांसाठी ३० हजारांपर्यंत खर्च येतो. एका दिवसात ५ ते ७ झाडांचे पुनरेपण केले तर एका झाडासाठी अंदाजे ६ ते ८ हजार रुपये खर्च होतात. सध्या हे पैसे उभारण्यासाठी आम्ही समाजमाध्यमांचा वापर करत आहोत. अनेक पर्यावरणप्रेमी आम्हाला अर्थसहाय्य करत आहेत. सामाजिक कामात समाजमाध्यमे सक्रिय सहभाग दर्शवतात. ही संकल्पना गोरेगावमध्ये राबवून चार झाडांचे पुनरेपण केले, तेव्हा अनेक लोकांनी आर्थिक मदतीचा हात पुढे केला. आजही मदत मिळते आहे. केवळ आर्थिक मदतच नाही तर या कामाचा समाजात सकारात्मक परिणामही झाला. अनेक संस्था, गृहसंस्थांनी आम्हाच्याशी संपर्क साधून या प्रक्रियेची माहिती विचारली, तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले आणि त्यांनीही आपापल्या परिसरातील झाडांचे प्राण वाचवले. गोरेगाव, वांद्रे, सांताक्रूझ,चेंबूर, वरळी, दादर अशा विविध ठिकाणी या प्रक्रियेतून वीसहून अधिक झाडांचा पुनर्जन्म झाला आहे.

traffic police action against goon nilesh ghaiwal
गुंड नीलेश घायवळला वाहतूक शाखेचा दणका, मोटारींना काळ्या रंगाच्या काचांचा वापर केल्याप्रकरणी दंड
Firing over a petty dispute at Antop Hill
ॲन्टॉप हिल येथे किरकोळ वादातून गोळीबार
Navi Mumbai, Youth Attacks, Man, Broken Glass Bottle, Alleged Spitting Incident, police, crime news, marathi news,
नवी मुंबई: थुंकल्याच्या क्षुल्लक कारणावरून फुटलेल्या काचेच्या बाटलीने गळ्यावर वार 
sangli wild animal attack marathi news
सांगली : हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात २४ मेंढ्या ठार, ७ गायब

’ नागरिक किंवा गृहसंस्था यासाठी काय करू शकतील?
सध्या आमच्यासमोर सर्वात मोठी अडचण आहे नागरिकांचे मन वळवणे. कारण अनेकांना या प्रक्रि येबाबत माहिती नाही. हे का करायला हवे ते लक्षात येत नाही. नवी झाडे लावणे महत्त्वाचे आहे, तेवढेच जुने वृक्ष सांभाळणेही महत्त्वाचे आहे. अनेकदा पडलेले झाड गृहसंस्थेच्या आवारात असल्याने काही सभासदांची अनुमती असते तर काहींचा विरोध असते. झाडे जगवणे किती महत्त्वाचे आहे हे समजून गृहसंस्थांनी भूमिका घ्यायला हवी. रस्त्यांवर पडलेली झाडे हटवण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याऐवजी तो जगवण्यासाठी घ्यावा.

’ या मोहिमेचे पुढचे लक्ष्य काय आहे?
नागरिकांना देशी-विदेशी झाडातील फरक समजावून सांगणे, देशी झाडांची सर्वाधिक लागवड करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. तसेच झाडांच्या आसपास होणाऱ्या बांधकामावर आळा घालण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. ‘झाडे पडली आहेत, मेली नाहीत’ या वाक्यातून लोकांचे डोळे उघडण्याकडे कल आहे. यासाठी ‘सेव्ह मुंबईज् फॉलन ट्री’ नावाने मोहीम उभारण्यात आली असून जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग वाढवण्याचे काम सुरू आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे कार्य पालिकेपर्यंत पोहोचले आहे. आता पालिकेने एक पाऊल पुढे टाकले तर अधिक झाडे जगू शकतात. कारण पालिकेकडे सर्व प्रकारची यंत्रे, तज्ज्ञ मंडळी, मनुष्यबळ असल्याने हे काम अधिक सहज आणि वेगात होऊ शकते, त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
मुलाखत : निलेश अडसूळ