वार्षिक अडीच लाखांपेक्षा अधिक योगदान करपात्र; व्याज नोंदीसाठी स्वतंत्र खाते

मुंबई : कर्मचाऱ्यांचे भविष्यनिर्वाह निधी (ईपीएफ) त्याचप्रमाणे स्वेच्छिक भविष्यनिर्वाह निधी (व्हीपीएफ) असे एकत्रित योगदान वार्षिक २.५ लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास ते यापुढे करपात्र ठरेल. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने यासंबंधीची अधिसूचना प्रसिद्ध केली असून, या नवीन करभाराची अंमलबजावणी १ एप्रिल २०२२ पासून होणार आहे. अर्थात चालू आर्थिक वर्षातील पीएफ योगदानाची करपात्रतेच्या दृष्टीने मोजदाद सुरूही झाली आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अधिसूचनेनुसार, ‘पीएफ’वरील करपात्र व्याज मोजण्यासाठी आता कर्मचाऱ्यांचे विद्यमान भविष्यनिर्वाह निधी खाते दोन स्वतंत्र खात्यांमध्ये विभागले  जाणार आहे. ‘पीएफ’वरील व्याज वेगळ्या खात्यात जमा केले जाईल.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी, १ फेब्रुवारी २०२१ रोजी मांडलेल्या अर्थसंकल्पात पगारदारांना वाढीव कर सवलत दिलेली नसली तरी त्यांच्यावरील करांचा भारही वाढलेला नाही, असे म्हटले होते. प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांच्या पीएफ योगदानाला करांची कात्री लावणारी ही तरतूद त्या अर्थसंकल्पातच करण्यात आली आहे.

अधिसूचनेनुसार, १ एप्रिल २०२१पासून कर्मचारी आणि नियोक्ता यांचे भविष्य निर्वाह निधीतील एकत्रित योगदान, त्याचप्रमाणे ‘कलम ८० सी’प्रमाणे करवजावटीसाठी ‘ईपीएफ’मध्ये अतिरिक्त योगदान यांचे एकत्रित प्रमाण एका वर्षात २.५ लाख रुपये अथवा त्यापेक्षा जास्त, त्यावरील व्याज उत्पन्न हे करपात्र ठरेल. सरकारी कर्मचाऱ्यांबाबत करपात्र पीएफ योगदानाची कमाल मर्यादा ५ लाख रुपये आहे.

कर्मचाऱ्यांच्या वार्षिक योगदानातून २.५ लाखांपेक्षा जास्त पीएफ योगदानावरील व्याज उत्पन्नावर नवीन कर लागू करण्यासाठी प्राप्तिकर नियमांमध्ये नवीन ‘कलम ९ डी’ समाविष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार सर्व कर्मचारी भविष्य निधी खाती करपात्र आणि कर-नसलेल्या योगदान खात्यांमध्ये विभागली जाणार आहेत.

प्राप्तिकर कायद्याच्या कलम १०(११) अंतर्गत भविष्य निर्वाह निधीवर मिळणारे ‘व्याज’ संपूर्णत: कोणत्याही मर्यादेशिवाय करमुक्त होते. उपकलम (१२) अंतर्गत चौथ्या अनुसूचीच्या भाग ए च्या नियम ८ मध्ये दिलेल्या मर्यादेपर्यंत, ‘संचित शिल्लक’ मान्यताप्राप्त भविष्य निर्वाहनिधीत भाग घेत असलेल्या कर्मचाऱ्यास देय झाल्यानंतरही पूर्णत: करमुक्त होती. अर्थसंकल्प २०२१ मधील बदलानुसार १ एप्रिल २०२१ नंतर, पीएफ खात्यात वार्षिक अडीच लाखांवरील योगदानावर जमा होणारे सर्व व्याज आता करपात्र ठरेल, असे पुण्यातील सनदी लेखापाल दिलीपी सातभाई यांनी सांगितले.

होणार काय?

भविष्य निधी खाती करपात्र आणि कर-नसलेल्या योगदान खात्यांमध्ये विभागली जाणार.

२.५ लाखांपेक्षा जास्त पीएफ योगदानावरील व्याज उत्पन्नावर कर आकारणीसाठी प्राप्तिकर नियमांत ‘कलम ९ डी’ समाविष्ट.