‘कॅब’ना सर्वाधिक मागणी असलेल्या भागांमध्ये वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम

नववर्षांचे स्वागत करताना दारूच्या नशेत वाहने चालवून नियम पायदळी तुडवणाऱ्या मद्यपी चालकांना चाप लावण्यासाठी वाहतूक पोलिसांनी अ‍ॅपआधारित टॅक्सी सेवांची मदत घेतली आहे. गतवर्षी शहराच्या कोणत्या भागातून सर्वाधिक टॅक्सी सेवेचा लाभ घेतला गेला याची माहिती घेऊन पोलीस यंदा त्या भागात तळीराम चालकांविरोधात विशेष मोहीम राबवणार आहेत.

वाहतूक पोलीस दलाचे सहआयुक्त मधुकर पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार अ‍ॅपआधारित टॅक्सी सेवेकडून गेल्या वर्षी ३१ डिसेंबरला मरिन ड्राइव्ह, सहार, सांताक्रूज, कमला मिल, अंधेरीतील लोखंडवाला संकुल, वांद्रे-खार जोडणारा जोडरस्ता (लिंकिंग रोड), जुहू तारा रोड, गेट वे ऑफ इंडिया अशा ठिकाणांहून सर्वाधिक अ‍ॅपआधारित टॅक्सी सेवेचा वापर करण्यात आला होता. टॅक्सी सेवांनी पुरवलेल्या या यादीतील प्रत्येक ठिकाणी नववर्ष स्वागतासाठी पब, नाइट क्लब, लाऊंज, हॉटेल, बार असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यावरून येथे तळीरामांची गर्दी होते, असा अंदाज बांधून या ठिकाणी जास्त मनुष्यबळ ठेवून कारवाई केली जाईल.

नववर्षांच्या पूर्वसंध्येला वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलिसांकडून शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करून तळीराम चालकांसह वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची धरपकड केली जाते. या वेळी ठरलेल्या ठिकाणांवर नाकाबंदी असतेच, पण अनपेक्षित ठिकाणीही अशी कारवाई केली जाते. गेल्या काही वर्षांत नववर्षांच्या पूर्वसंध्येला शहराच्या कोणत्या भागात तळीराम चालकांवरील कारवाईचे प्रमाण जास्त आहे याच्या नोंदी आणि अ‍ॅपआधारित टॅक्सी सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांनी पुरवलेली यादीतील ठिकाणांची जुळवाजुळव करून वाहतूक पोलिसांनी ३१ डिसेंबरच्या संध्याकाळपासून १ जानेवारीच्या पहाटेपर्यंत शहरात कुठे कुठे नाकाबंदी करावी, याची व्यूहरचना आखली आहे.

थर्टीफस्टनिमित्त दारू उपलब्ध करून देणाऱ्या खासगी आस्थापनांसाठी काही वर्षांपूर्वी मुंबई पोलिसांनी नियमावली काढली होती. दारूच्या नशेत ग्राहकाला चालक उपलब्ध करून द्यावा, तशी व्यवस्था ठेवावी, जर ग्राहकाने दारूच्या नशेत वाहन चालवून अपघात केला किंवा नाकाबंदीत पकडला गेला तर त्यात संबंधित आस्थापनेलाही जबाबदार धरले जाईल. ही सूचना यंदाही लागू करण्याचा विचार वाहतूक पोलिसांकडून सुरू आहे. वाहतुकीचे सर्व नियम पाळून नववर्षांचे स्वागत करा. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल. त्यामुळे नववर्षांची सुरुवात नियम मोडून, त्याबद्दल दंड भरून करू नये, असे आवाहन सहआयुक्त पांडे यांनी नागरिकांना केले आहे.

गुरुवारपासूनच तपासणीला सुरुवात

यंदा ३१ डिसेंबरला मंगळवार आहे. त्या दिवशी दारूविक्री तुलनेने कमी होईल, असा अंदाज असला तरी वाहतूक पोलिसांनी सज्जता ठेवली आहे. पोलिसांनी शहरात अनेक ठिकाणी नाकाबंदी करून दारूच्या नशेत वाहने चालवणाऱ्यांसह वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. यात रात्रीच्या सुमारास शहरातील मोकळ्या रस्त्यांवरून धावणाऱ्या दुचाकींची झाडाझडती होणार आहे.