मुंबईत एका चहावाल्याने एक, दोन नव्हे तर चक्क ६ बँका लुटून कोटय़वधी रुपयांची माया जमवली होती. या चहावाल्याची योजना एवढी पद्धतशीर असायची की पहिल्या पाच बँकांतील चोरीचा पोलिसांना सुगावाही लागला नाही. मात्र, घाटकोपरमधील कॅनरा बँकेतील चोरी प्रकरणात तो सापडलाच..

२६ ऑगस्ट २०१४. घाटकोपर रेल्वे स्थानकासमोरची कॅनरा बँक हादरली. एका सराईत चोराने बनावट चावीने बँकेत प्रवेश करून स्ट्रॉंगरूममधील ५५ लाख रुपये लंपास केले. एवढय़ा लिलया त्याने ही चोरी केली होती की पोलीसही चक्रावले. चोराने बनावट चावीने बँकेचे शटर उघडले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसू नये म्हणून रेनकोट, हेल्मेट घातले होते. कुठेही पुरावा सापडू नये यासाठी हातमोजे घातले होते. बँकेत येताच त्याने धोक्याची सूचना देणारा अलार्म बंद केला होता. हा अलार्म बंद करण्यासाठी असलेला कोड त्याला माहिती होता. त्यामुळे कुणा माहीतगाराचेच हे काम असावे असा पोलिसांना संशय होता. पण कोण ते समजत नव्हते. बँकेच्या सर्वाची चौकशी करून झाले. पण काहीच हाती लागले नसल्याने या चोरीचे गूढ वाढले होते.

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी परिमंडळ ७चे तत्कालीन पोलीस उपायुक्त विनय राठोड यांनी घाटकोपर पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजाराम व्हनमाने, पोलीस निरीक्षक याकूब मुल्ला, राजेंद्र कुलकर्णी यांचा समावेश असलेले एक पथक तयार केले. या चोराने कुठलाच पुरावा ठेवलेला नव्हता. त्यामुळे पोलिसांपुढे आव्हान होते. बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून कसलाच सुगावा मिळत नव्हता. मग पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. बनावट चावीने त्याने बँक उघडली होती. त्यामुळे चावी बनविणाऱ्यांचा शोध घ्यायचे ठरवले. घाटकोपर पोलिसांनी चावीवाल्यांची चौकशी करण्यास सुरुवात केली. दररोज मुंबईतील चावीवाल्यांना बोलावून चौकशी केली जात होती. अडीचशेहून जास्त चावी बनविणारे पोलिसांच्या रडारवर आले. शेवटी पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले. युसुफ मेहबूब खान (३६) आणि इरफान मोहम्मद नसीम खान (३२) या चावीवाल्यांनी बनावट चावी बनवून दिल्याचे मान्य केले. त्यांनी ज्याला बनावट चावी बनवून दिली त्याचे नाव ऐकून पोलीस हैराण झाले. तो होता त्याच बँकेचा चहावाला ऋषिकेश बारिक (३३).

ऋषिकेश मूळचा भुवनेश्वरचा होता. चोरीच्या काही दिवस आधीच तो गावी जातो असे सांगून गेला होता. पोलीस पथक लगेच त्याच्या गावी पोहोचले आणि त्याला बेडय़ा ठोकल्या. बँकेच्या एका कर्मचाऱ्याच्या मदतीने त्याने हा कट रचला होता. विशेष म्हणजे यापूर्वी त्याने दादर, गोवंडी, अंधेरी आणि घाटकोपर परिसरातील एकूण ६ बँकांचे ‘स्ट्राँगरूम’ बनावट चावीने उघडून सुमारे कोटय़वधी रुपयांची चोरी केली आणि पचवलीदेखील होती.

चहावाल्याची बँक लुटण्याची कला ऐकून पोलीस थक्क झाले. तो पनवेलला पत्नी आणि मुलांसह राहात होता. १२वी शिकलेला ऋषिकेश पिडिलाइट कंपनीत फिटर म्हणून नोकरी करीत होता. २००६ मध्ये फॅक्टरी बंद झाल्यामुळे तो  दादरच्या शिवाजी पार्क येथे एका उडपी हॉटेलात चहा पोहचवण्याचे काम करू लागला. ऋषिकेश त्याच परिसरात असलेल्या देना बँकेत चहा पोहचवण्यासाठी जात होता. बँकेतील सर्वाची ओळख झाली होती आणि बँकेची खडानखडा माहिती त्याला होती. त्याच वेळेला बँक लुटण्याची कल्पना त्याला सुचली. बँकेच्या अधिकाऱ्याला हाताशी धरून त्याने योजना बनवली. या अधिकाऱ्यामार्फत त्याने देना बँकेच्या बनावट चाव्या बनवून घेतल्या आणि स्ट्राँगरूममधून २० लाख ४० हजार रुपयांची रोकड चोरी केली. त्यानंतर २०११ मध्ये शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत युनियन बँकेत १५ लाख २२ हजार रुपयांची चोरी केली. २००६मध्ये देना बँकेत झालेल्या चोरीचे प्रकरण शांत होताच त्याच बँकेत त्याच अधिकाऱ्याच्या मदतीने ऋषिकेशने २०१२ मध्ये २९ लाख १ हजार ८८१ रुपयांची चोरी केली. वर्षभराने देना बँकेतील अधिकाऱ्याची गोवंडी येथील शाखेत बदली झाल्यानंतर २०१३ मध्ये त्या अधिकाऱ्याने ऋषिकेशला बोलावून बनावट चाव्या तयार करून बँकेच्या स्ट्राँगरूममधून १३ लाख रुपये लंपास केले. २०१३मध्ये अंधेरी पूर्व एमआयडीसी येथील एक्सलंट को-ऑप. बँक मरोळ येथे चहावाला बनून बँकेची टेहळणी करून त्याने बँक कर्मचाऱ्यांच्या मदतीने ४२ लाख ३३ हजार ७८० रुपयांची चोरी केली.

कॅनरा बँकेत चोरी करताना त्याने महिनाभर आधी योजना बनवली. दुसऱ्या हॉटेलमधून १६ रुपयांना चहा आणून तो कॅनरा बँकेतील कर्मचाऱ्यांना ६ रुपयांना द्यायचा. चांगला चहा कमी किमतीत देऊन त्याने बँकेच्या  कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन केला. सुमारे २५ दिवस ऋषिकेशबाहेरच्या हॉटेलातून स्पेशल चहा आणून बँकेत देत होता. या काळात त्याने बँकेची पाहणी केली. तसेच येथील एका महिला कर्मचाऱ्याला मोठय़ा रकमेचे आमिष दाखवून आपल्या कटात सहभागी करून घेतले. तिच्याकडून चाव्या घेतल्या आणि युसुफ आणि इरफान या दोघांच्या मदतीने शटरची चावी तयार करून घेतली. ऋषिकेशला कुठलेही व्यसन नसल्यामुळे त्याने चोरीचा सर्व पैसा ओरिसा येथील विविध १७ बँकांमध्ये ठेवला होता, तसेच १५ ठिकाणी त्याने चोरीच्या पैशातून जमिनी विकत घेतल्या आहेत. त्याच्या या कृष्णकृत्यांचा त्याच्या कुटुंबीयांनाही थांगपत्ता नव्हता, हे विशेष!