२०, २१ फेब्रुवारी रोजी देशव्यापी संप
प्राथमिकपासून पदवी शिक्षणापर्यंतच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी २० आणि २१ फेब्रुवारीला होणाऱ्या देशव्यापी संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून याचा थोडाफार फटका २१ फेब्रुवारीच्या बारावीच्या परीक्षेला बसण्याची शक्यता आहे.
बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होते आहे, पण २० आणि २१ फेब्रुवारीला डाव्या संघटनांनी देशव्यापी संप पुकारला आहे. या संपात केजीपासून पीजीपर्यंतच्या शिक्षक संघटनांचे संघटन असलेल्या ‘शिक्षक संघटना समन्वय समिती’ने सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. यात प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक (कनिष्ठ महाविद्यालये) आणि पदवी शिक्षकांच्या संघटनांचा सहभाग आहे. त्यामुळे, बारावीच्या परीक्षांना संपाचा थोडाफार फटका बसेल, अशी शक्यता आहे.दरम्यान ‘महाराष्ट्र फेडरेशन फॉर युनिव्हर्सिटी अ‍ॅण्ड कॉलेज टीचर्स ऑर्गनायझेशन’ (एमफुक्टो) या प्राध्यापकांच्या संघटनेने विद्यापीठ परीक्षांवर आपला बहिष्कार कायम असल्याचे मंगळवारी स्पष्ट केले.

बारावीच्या परीक्षेवरील बहिष्कार मागे
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाने बारावीच्या परीक्षेवरील बहिष्कार मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे. संघटनेच्या प्रतिनिधींनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री डी. पी. सावंत यांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर बहिष्कार मागे घेतल्याचे जाहीर करण्यात आले. २ फेब्रुवारीपासून या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेच्या कामावर बहिष्कार टाकला होता. पण हा बहिष्कार तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महासंघाच्या वतीने सांगण्यात आले. मात्र, देशव्यापी संपात संघटना सहभागी असेल, असे महासंघाचे अध्यक्ष आर. बी. सिंह यांनी स्पष्ट केले आहे.