वडाळ्याच्या एका शाळेत शिक्षकांकडूनच दहावीच्या विद्यार्थिनींचा विनयभंग होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मंगळवारी सायंकाळी वडाळा पोलिसांनी या प्रकरणी तीन शिक्षकांना अटक केली. वर्षभरापासून हे शिक्षक विद्यार्थिनींचा विनयभंग करत होते.
वडाळा पूर्व येथील या माध्यमिक शाळेत मदन कोळकर, दीपक आवारे आणि किशोर बरगडे हे तिघे गेल्या वर्षी  कंत्राटी पद्धतीने रुजू झाले. तेव्हापासून ते दहावीच्या विद्यार्थिनींचा विनयभंग करीत होते. मंगळवारी एका पीडित मुलीने फिर्याद दिल्यानंतर या शिक्षकांना अटक करण्यात आल्याची माहिती वडाळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक पांडुरंग इंदुलकर यांनी दिली.
अनेक मुलींनी या त्रिकुटाविरोधात विनयभंगाची तक्रार दिली असून मंगळवारी रात्री उशिरापर्यत ११ विद्यार्थिनींनी तक्रारी दिल्या होत्या. मधल्या सुटीत, शाळा सुटल्यावर आणि एकटयाने बोलावून ते विनयभंग करीत असल्याची तक्रार या विद्यार्थिनींनी दिली आहे.
या शिक्षकांविरोधात शाळेच्या व्यवस्थापनाकडे यापूर्वी तक्रारी करण्यात आल्या होत्या. पण त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप शाळेतल्या शिक्षकांनी केला आहे. मंगळवारी शिक्षक आणि या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी वडाळा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली.
 अनेक विद्यार्थिनी तक्रार देण्यासाठी पुढे येत आहेत. त्याचा आम्ही तपास करत आहोत, असे इंदुलकर यांनी सांगितले. आज, बुधवारी या तीनही शिक्षकांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.