अ‍ॅप, संकेतस्थळ आदीतून शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्याकरिता विविध शैक्षणिक प्रयोग राबविण्यात महिला शिक्षिकाही मागे नसल्याचे नाशिकच्या एका जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत असलेल्या उपशिक्षिकेने दाखविले आहे.
पहिल्यांदाच राज्यातील एका महिला शिक्षिकेने या क्षेत्रात पहिले पाऊल टाकत ‘बालस्नेही’ नामक संकेतस्थळ विकसित केले आहे. बालककेंद्री, बालसुलभ असा ज्ञानरचनावाद, ई-लर्निग आणि ‘बिल्डिंग अ‍ॅज लर्निग अ‍ॅक्टिव्हिटी’ यांचा समन्वय साधून तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळाचे सोमवारी शालेय शिक्षण सचिव नंदकुमार यांच्या उपस्थितीत औपचारिक उद्घाटन होत आहे.
निफाड तालुक्यातील चांदोरी शाळेच्या उपशिक्षिका गौरी पाटील यांनी http://www.balsnehi.in हे संकेतस्थळ विकसित केले आहे. यात विद्यार्थ्यांकरिता विविध शैक्षणिक उपक्रम कसे राबवायचे याचे मार्गदर्शन आहे.स्वाध्यायपुस्तिका या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येणार आहे. ‘नाशिकमध्ये शिक्षकांसाठी राबविण्यात आलेल्या तंत्रस्नेही कार्यशाळेमुळे मला हे संकेतस्थळ विकसित करण्याची प्रेरणा मिळाली. शिक्षणाच्या नव्या प्रवाहाशी संबंधित माहिती संकेतस्थळावर देण्याचा प्रयत्न राहणार आहे,’ असे गौरी पाटील यांनी सांगितले.