विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमध्ये येत्या मंगळवारी होणाऱ्या निवडणुकीचा प्रचार रविवारी संपला. पाचही मतदारसंघांमध्ये सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चुरशीच्या लढती होत असून, ही निवडणूक जातीय वळणावर अधिक गेली.

पुणे पदवीधर आणि शिक्षक, नागपूर पदवीधर, औरंगाबाद पदवीधर व अमरावती शिक्षक या पाच मतदारसंघांमध्ये मंगळवारी मतदान होत आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील निवडणुका या संघटना पातळीवर लढविल्या जात असत; परंतु अलीकडे राजकीय पक्षांनी या निवडणुकांमध्ये अधिक रस घेतला. शिक्षक मतदारसंघांमध्ये शिक्षक संघटनांचे उमेदवार असत. या वेळी मात्र शिक्षक मतदारसंघांमध्येही राजकीय पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत.

नागपूर आणि औरंगाबाद या पदवीधर मतदारसंघांमध्ये प्रचार हा जातीय वळणावर अधिक गेला. नागपूरमध्ये भाजपचे संदीप जोशी विरुद्ध काँग्रेसचे अभिजित वंजारी यांच्यात लढत होत आहे. नागपूर पदवीधर हा मतदारसंघ भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जात असल तरी या वेळी काँग्रेसने अधिक जोर लावला. यामुळे भाजपलाही सारी ताकद पणाला लावावी लागली.

औरंगाबादमध्ये माजी आमदार सतीश चव्हाण व भाजपचे शिरीष बोराळकर यांच्यात लढत होत असून, मराठवाडय़ात नेहमीप्रमाणेच प्रचार हा जातीय वळणावर अधिक गेला होता.

पुणे पदवीधरमध्ये भाजपचे संग्राम देशमुख विरुद्ध राष्ट्रवादीचे अरुण लाड यांच्यात चुरशीची लढत होत आहे. ही जागा कायम राखण्याकरिता भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी सारी ताकद पणाला लावली. ही जागा भाजप कायम राखेल, असा ठाम विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त के ला. दुसरीकडे राष्ट्रवादीने आपली सारी यंत्रणा या निवडणुकीत उतरविली आहे.

आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र विरुद्ध भाजप अशी सरळ लढत प्रथमच होत आहे. करोनामुळे महानगरपालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या. यामुळे या निवडणुकीच्या निमित्तानेच प्रथमच महाविकास आघाडी आणि भाजप आमनेसामने आले आहेत.

भाजपसाठी पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघ कायम राखणे हे प्रतिष्ठेचे आहे. राष्ट्रवादीने औरंगाबाद पदवीधर कायम राखण्याबरोबरच पुणे पदवीधरवर अधिक लक्ष केंद्रित केले. काँग्रेसचा जोर हा नागपूर पदवीधर आणि पुणे शिक्षकवर आहे. शिवसेनेने अमरावती शिक्षक मतदारसंघ कायम राखण्याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा के ली.