मुलींसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या नव्या सूचना

वर्ग डिजिटल करायचेत म्हणून देणगी मिळवा, शाळेत पायाभूत सुविधा उभारायच्या आहेत, त्यासाठी निधी गोळा करा या अभियानांचा फेरा पूर्ण होत नाही, तोच आता शिक्षकांसमोर मुलींना शिक्षण साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी नवा व्याप उभा करण्यात आला आहे. आर्थिक मदत उपलब्ध करू शकतील, अशा गावांतील दानशूर व्यक्तींना शोधण्याचा. सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त शिक्षण विभागाकडून आखण्यात आलेल्या ‘लेक शिकवा’ अभियानांतर्गत मुलींना दानशूरांकडून मदत घेऊन शालेय साहित्य वाटण्याच्या सूचना शिक्षण विभागाने शाळांना केल्या आहेत. मुळातच सततची अभियाने लोकसहभागातून राबवल्यानंतर आता सततच्या उपक्रमांसाठी देणगीदार शोधायचे तरी कसे असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.

शिक्षणात राज्याला पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळावे म्हणून सातत्याने नवनवी अभियाने शिक्षण विभागाकडून राबवण्यात येतात. मात्र ही सर्व अभियाने शिक्षण विभागासाठी बिनखर्चाची व्हावीत यासाठी गावातील देणगीदारांकडून निधी गोळा करण्याचे फर्मान शिक्षण विभागाकडून सोडण्यात येते. आतापर्यंत डिजिटल शाळा असोत की शाळांमधील स्वच्छतागृहांचे बांधकाम असो शिक्षकांना देणगीदार शोधत फिरावे लागते आहे.

अभियान राबवले नाही तर कारवाईचा दट्टय़ा, खर्चासाठी निधी नाही आणि प्रत्येक अभियानासाठी स्वत:च्या खिशातून खर्च करणेही शक्य नाही अशा कोंडीत शिक्षक गेल्या दीड-दोन वर्षांपासून

सापडले आहेत. आता सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त शिक्षण विभागाकडून राबवण्यात येणारे ‘लेक शिकवा’ अभियानही या ‘लोकसहभाग मिळवा अहवाल पाठवा’ या कार्यक्रमातून सुटलेले नाही.

प्रकार काय?

दरवर्षी ३ ते २६ जानेवारी या कालावधीत लेक शिकवा अभियान राबवण्यात येते. मुलींना शिकण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात. माजी विद्यार्थिनींचे सत्कार, शाळाबाह्य़ मुलींना शाळेत आणण्यासाठी प्रयत्न, मुलींना शिकण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, अशा स्पर्धा-व्याख्याने यांचे आयोजन केले जाते. यंदा ४ जानेवारीला मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात यावे अशी सूचना शिक्षण विभागाने दिली आहे. मात्र हे शैक्षणिक साहित्य लोकसहभागातूनच शिक्षकांनी मिळवावे अशी अपेक्षा शिक्षण विभागाने व्यक्त केली आहे. ‘गावातील ग्रामपंचायत, बँका, पतसंस्था आणि गावातील दानशूर नागरिकांकडून शालेय गरजेच्या वस्तू मुलींना वाटण्यासाठी मिळवाव्यात,’ असे याबाबतच्या पत्रात शिक्षण विभागाने नमूद केले आहे.

शिक्षकांची अडचण

गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने चालणाऱ्या विविध अभियानांसाठी आणि शाळा ‘प्रगत’ करण्यासाठी निधी मिळवल्यानंतर आता या अभियानासाठी आणि येऊ घातलेल्या नव्या अभियानांसाठी दानशूर शोधायचे तरी कुठे असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. ‘शाळेत हात धुण्याची जागा, डिजिटल साहित्य लोकांच्या देणगीतून उभे केले. त्या वेळी नवे काही म्हणून नागरिकांनीही जमेल तशी मदत केली. मात्र शिक्षण विभागाकडून सतत वेगवेगळी अभियाने येतात. ती चांगलीही असतात. मात्र त्यासाठी खर्च करण्याची विभागाची तयारी नसते. दरवेळी नागरिक पैसे कुठून देणार, शिक्षकांनी सतत नवे देणगीदार कसे शोधायचे?’ असा प्रश्न एका शिक्षकाने उपस्थित केला आहे.