सानपाडा येथील रायन इंटरनॅशनल या शाळेत बालवाडीमध्ये शिकणाऱ्या एका साडेतीन वर्षांच्या चिमुकलीला शिक्षिकेने अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आयुषी प्रवीण पाटील असे या विद्यार्थिनीचे नाव असून यासंदर्भात आयुषीच्या पालकांकडून शाळेविरोधात तुभ्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी दुपारी आयुषी शाळेत गेली असताना ती शाळेत पडली असल्याचा फोन शाळेकडून आल्यानंतर आयुषीची आई तिला आणण्यासाठी शाळेत गेली. काही वेळ बाहेर उभे करून आयुषीच्या आईला आयुषीच्या वर्गात नेण्यात आले, तिथे आयुषीला पाहून तिच्या आईला धक्का बसला. आयुषीच्या तोंडावर सर्व ठिकाणी मारहाण करण्यात आल्याच्या खुणा होत्या़ तर मानेवर, हाताच्या दंडावर आणि पाठीवरदेखील भरपूर वळ उठले होते. हा प्रकार पाहून हादरलेल्या आयुषीच्या आईने वर्गशिक्षिकेकडे याबाबत विचारणा केली मात्र वर्गशिक्षिकेने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. अखेर आयुषीच्या आईने याबाबत शाळेच्या मुख्याध्यापिकेकडेही तक्रार केली मात्र याप्रकरणी टोलवाटोलवीची उत्तरे देऊन दुर्लक्ष केले. हा प्रकार घडल्यावर शाळेतून आयुषीवर कोणतेही प्राथमिक उपचार करण्यात आले नाहीत. अखेर मंगळवारी संध्याकाळी या प्रकरणी आयुषीच्या पालकांनी तुभ्रे पोलीस ठाण्यात शाळेविरोधात तक्रार दाखल केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 25, 2014 4:02 am