वशिलेबाजी, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नियुक्ती प्रक्रिया ऑनलाइन

राज्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका तसेच खाजगी अनुदानित शाळांमध्ये तब्बल ३० हजार शिक्षक व मुख्याध्यापकांची पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी शिक्षण विभागाने स्वतंत्र व्यवस्था केली आहे. यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षक उपलब्ध होणार असून, वशिलेबाजी आणि भ्रष्टाचाराला कोणताही थारा मिळणार नाही, असा विश्वास शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला आहे.

राज्यामध्ये जिल्हा परिषदेच्या ६६ हजार शाळा असून, २० हजार अनुदानित खाजगी शाळा तसेच पालिका व नगरपालिकांच्या मिळून एक लाख दोन हजार शाळा आहेत. या शाळांमध्ये शिक्षक व मुख्याध्यापकांची तब्बल ३० हजार पदे रिक्त असून, खासगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांची भरती करताना लोखो रुपये दिल्याशिवाय संस्थाचालक शिक्षकांची नियुक्ती करत नसल्याच्या तक्रारी विधिमंडळातही अनेक आमदारांनी केल्या. या शिक्षण संस्था चालकांना कसा चाप लावायचा, हा यक्षप्रश्न शिक्षण विभागापुढे निर्माण झाला होता. याशिवाय जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिक्षकांची भरती करताना सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेतली जायची तसेच जिल्हाधिकारी अथवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून नगर परिषदा, पालिकांमध्ये शिक्षकांची भरती केली जायची. शिक्षण विभागाने शिक्षक भरतीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सीईटी परीक्षा तसेच जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे अधिकार रद्द केले तसेच खासगी शाळांच्या संस्थाचालकांना त्यांना आवश्यक असणाऱ्या शिक्षकांची यादी देण्यास सांगण्यात आले आहे.

ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली असून यापुढे राज्यासाठी एकच ‘अभियोग्यता चाचणी’ परीक्षा (अ‍ॅप्टिटय़ुड टेस्ट) घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून त्यातून पात्र शिक्षकांची यादी जाहीर करण्यात येणार असून विषय व बिंदुनामावलीनुसार संबंधित खासगी अनुदानित शिक्षण संस्थांनी याच यादीमधून त्यांना अवश्यक असलेल्या शिक्षकांची निवड करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

‘महाराष्ट्र खासगी शाळा सेवा कायदा १९८१’ अंतर्गत खासगी अनुदानित शाळांना आवश्यक असलेल्या शिक्षकांची निवड करता येणार आहे. त्यांच्या अधिकारांना यात कोणतीही बाधा असणार नाही. तथापि, अ‍ॅप्टिटय़ूड टेस्टमध्ये निवड झालेल्या पात्र शिक्षकांमधूनच त्यांना आपल्या संस्थेत शिक्षक भरता येतील, असे शिक्षण विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना विचारले असता गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना मिळण्यास माझे सर्वोच्च प्राधान्य होते त्यामुळे थोडा उशीर झाला असला तरी या नव्या पद्धतीमुळे कोणताही वशिलेबाजी न होता गुणवत्तापूर्ण शिक्षक व मुख्याध्यापक उपलब्ध होणार आहेत.

९७ हजार उमेदवार

  • शिक्षक भरती प्रक्रियेसाठी सरकारने ‘पवित्र’ नावाचे पोर्टल सुरू केले आहे. त्यावर मंगळवारी सायंकाळपर्यंत ९७ हजार उमेदवारांनी अर्जनोंदणी केली.