नोकरीत कायम करून देतो, असे आश्वासन देऊन शिक्षकांना लाखो रुपयांना गंडा घालण्याचा प्रकार मानखुर्द येथील महाराष्ट्र बालविकास शाळेत उघडकीस आला आहे. शिक्षकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शाळेचे अध्यक्ष आणि निरीक्षकाला अटक केली आहे. या दोघांनी एकून ७ शिक्षकांना २६ लाख रुपयांचा गंडा घातल्याची बाब समोर आली आहे
विश्वास शिऊडकर (३८) या शिक्षकाने याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. शिऊडकर हे २००९ साली मानखुर्दच्या महाराष्ट्र बालविकास या अनुदानित शाळेत नोकरीस लागले होते. शाळा निरीक्षक रघुनाथ शिंदे आणि अध्यक्ष इम्रान आझमी यांनी नोकरीत कायम करून देतो, असे आश्वासन देत पाच लाखांची मागणी त्यांच्याकडे केली. शिऊडकर यांनी या दोघांना टप्प्याटप्प्याने दोन लाख रुपये दिले. परंतु शिऊडकर यांना कायम केले गेले नाही. या उलट एप्रिल २०१३ मध्ये त्यांना शाळेतून निलंबित करण्यात आले. या दोघांनी वारंवार पैशांची मागणी करूनही पैसे परत केले नाही.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शिऊडकर यांनी पोलिसांत तक्रार दिली. शिंदे आणि आझमी यांनी शाळेतील अन्य ७ शिक्षकांना अशाच पद्धतीने नोकरीत कायम करण्याचे आश्वासन देऊन सुमारे २६ लाखांचा गंडा घातल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या दोघांना फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक केल्याची माहिती मानखुर्द पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकरसिंग राजपूत यांनी दिली. शिंदे आणि आझमी याला ३० सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.