31 October 2020

News Flash

बालवाडी ते सातवी एकच शिक्षक

महापालिकेने ग्रँट रोड परिसरात जगन्नाथ शंकरशेठ ही इंग्रजी माध्यमाची शाळा १९६३मध्ये सुरू केली होती.

मुंबई महापालिकेच्या शाळेतील प्रकार; पाच वर्षांपासून बदली शिक्षकांवर मदार
राज्यात एकिकडे शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत तर दुसरीकडे एकाच शिक्षकाला बालवाडीपासून सातवीपर्यंतचे वर्ग सांभाळावे लागत आहे. ही तारेवरची कसरत होत आहे ती मुंबई महानगर पालिकेच्या ग्रँट रोड येथील जगन्नाथ शंकरशेठ इंग्रजी शाळा आणि मुंबई पब्लिक स्कूलमधील शिक्षकाची. हीच परिस्थिती सलग चार वर्षांपासून असून पालिका प्रशासनाचे मात्र याकडे लक्ष नसल्याचे वारंवार स्पष्ट होत आहे.
या दोन्ही शाळांना एकच कायमस्वरूपी शिक्षक कार्यरत असून तेच अकरा वर्गाचा सांभाळ करत आहे. दोन शाळांपैकी एका शाळेत ५५ तर दुसऱ्या शाळेत ४४ विद्यार्थी शिकत आहेत. यात मुंबई पब्लिक स्कूलमध्ये सात तर जगन्नाथ शंकरशेठ इंग्रजी माध्यमाच्या शाळेत चार वर्ग सुरू आहेत. या शाळांमध्ये कार्यरत असलेल्या दोन कायमस्वरूपी शिक्षकांची पालिका प्रशासनाने २०११ आणि २०१२मध्ये बढती देऊन बदली केली. यानंतर तेथे कायमस्वरूपी शिक्षक देण्यात आलेला नसून दर वर्षी जुलै महिन्यात दोन्ही शाळांसाठी मिळून तीन तात्पुरत्या शिक्षकांची नियुक्ती केली जाते. मात्र हे शिक्षकही नियमित शाळेसाठी उपलब्ध असतातच असे नाही. यामुळे शाळेच्या निकालावर परिणाम होतो आणि विद्यार्थिसंख्या घटत असल्याचे शिक्षण समितीचे सदस्य शिवनाथ दराडे यांनी सांगितले.
महापालिकेने ग्रँट रोड परिसरात जगन्नाथ शंकरशेठ ही इंग्रजी माध्यमाची शाळा १९६३मध्ये सुरू केली होती. यानंतर २००७-०८मध्ये याच वास्तूत पालिकेने मुंबई पब्लिक स्कूल या नावाने पहिली ते सातवीसाठी आणखी एक इंग्रजी शाळा सुरू केली. या शाळेत आजपर्यंत एकाही कायमस्वरूपी शिक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. तेथे तात्पुरत्या शिक्षकांची नियुक्ती होते आणि त्यांच्यामार्फत शाळेचे कामकाज चालते. यामुळे दोन्ही शाळांच्या प्राथमिक विभागाची जबाबदारी जगन्नाथ शंकरशेठ शाळेत नियुक्त असलेल्या शिक्षकांवरच येत असल्याचे दराडे यांनी नमूद केले. एक इंग्रजी माध्यमाची शाळा असताना पुन्हा दुसरी शाळा सुरू करण्यामागचे काय प्रयोजन होते. याचबरोबर विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या या अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांना निलंबित करावे असेही दराडे म्हणाले.
माध्यमिक शाळेत भाषेच्या शिक्षकांचा पत्ताच नाही
जगन्नाथ शंकरशेठ माध्यमिक शाळेत सध्या १८५ विद्यार्थी शिक्षण घेत असून तेथे नऊ शिक्षक कार्यरत आहेत. मात्र दुर्दैव म्हणजे २०११पासून या शाळेत मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषा शिकवण्यासाठी एकही शिक्षक उपलब्ध नाही. याचा परिणाम दहावीच्या निकालावर झाला असून या वर्षी शाळेतून २५ विद्यार्थी बसले होते. यापैकी आठ विद्यार्थी मराठी आणि इंग्रजी विषयांत नापास झाले असल्याची बाब दराडे यांनी लक्षात आणून दिली आहे. हा सर्व प्रकार गंभीर असून याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी व या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि ९० दिवसांच्या आत यावर योग्य ती कारवाई करावी अशा आशयाचे पत्र दराडे यांनी अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांना लिहिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2016 5:05 am

Web Title: teachers crises in jagannath shankar sheth municipal school in grant road
Next Stories
1 ‘परे’चा वक्तशीरपणा दुपटीने घसरला !
2 दक्षिण मुंबईतून ‘मराठी’ मार्गस्थ?
3 कालिना भूखंड घोटाळ्यातील मूळ व्यवहार्य अहवालही गायब!
Just Now!
X