नेट-सेटबाधित शिक्षकांच्या मागणीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांच्याशी झालेली चर्चा फारशी सकारात्मक न ठरल्याने येथून पुढे आम्ही केवळ मुख्यमंत्र्यांशीच चर्चा करू, असा निर्धार संपकरी प्राध्यापकांनी गुरूवारी आझाद मैदानात केलेल्या धरणे आंदोलनप्रसंगी जाहीर केला.
‘महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्‍‌र्हसिटी अ‍ॅण्ड कॉलेज टिचर्स असोसिएशन’ (एमफुक्टो) या प्राध्यापकांच्या राज्यव्यापी संघटनेतर्फे वेतन थकबाकी आणि नेट-सेटबाधित शिक्षकांच्या विविध मागण्यांवरून येथे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी शेकडोच्या संख्येने प्राध्यापक मैदानावर उपस्थित होते.
 ८० दिवस होऊनही आपल्या मागण्यांवर निर्णय न झाल्याने राज्य सरकारच्या निषेधार्थ प्राध्यापकांनी मोठी घोषणाबाजी यावेळी केली.
वेतन थकबाकी लगेचच देऊ. पण, नेट-सेटबाधित प्राध्यापकांच्या मागण्यांवर मला कॅबिनेट बैठकीतच चर्चा करावी लागेल, अशी भूमिका उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी प्राध्यापकांशी नुकत्याच झालेल्या बैठकीदरम्यान घेतली होती.
मंत्र्यांकडून ठोस आश्वासन मिळाल्यामुळे येथून पुढे आम्ही केवळ मुख्यमंत्र्याशीच चर्चा करू, असा निर्धार यावेळी करण्यात
आला.