शिक्षकांमध्ये नाराजी; संघटनेच्या मागणीकडे दुर्लक्ष

गेली तीन वर्षे चर्चेत असलेली अतिरिक्त शिक्षक समायोजनेची कारवाई ऐन गणेशोत्सवात करणार असल्याचे जाहीर झाल्यामुळे शिक्षकवर्गात नाराजी पसरली आहे. ही समायोजन प्रक्रिया सप्टेंबरआधीच पूर्ण करण्यात येणार होती. मात्र पुरेशा नियोजनाअभावी आता ८ ते १० सप्टेंबरदरम्यान ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

गणेशोत्सवात अनेक शिक्षक गावी जाऊन गणेशपूजनात सहभागी होतात. गणेशोत्सवात गावी जाण्यासाठी सहा महिने आधीच तिकिटांचे आरक्षण केले जाते, अशा वेळी समायोजन प्रक्रि येचा आदेश येणे पूर्णत: अनुचित आहे, असे मत रेडीज यांनी व्यक्त केले. शिक्षकांमध्ये यामुळे तणावाचे वातावरण असल्याने ही प्रक्रिया गणशोत्सवानंतर घेण्यात यावी, अशी लेखी मागणी संघटनेने ३१ ऑगस्ट रोजी केली आहे. मात्र त्याकडे अद्याप दुर्लक्षच करण्यात आले आहे, अशी खंत प्रशांत रेडीज यांनी व्यक्त केली.

आरटीई लागू केल्यापासून सुरू केलेली ही प्रक्रिया आजही पूर्ण झालेली नाही. ६ सप्टेंबर रोजी शिक्षणाधिकारी संबंधित हरकतींवर निर्णय घेणार असून त्यानंतर ८, ९ आणि १० सप्टेंबरला तीन फे ऱ्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

या काळात घरातील गणेशोत्सव आणि समायोजन प्रक्रिया या दोन्हींकडे लक्ष देणे शिक्षकांना शक्य होणार नाही. म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जातीने लक्ष घालून ही प्रक्रिया गणेशोत्सवानंतर करावी, अशी सर्व शिक्षकांची मागणी आहे.

समायोजनेसाठी मुख्याध्यापक व अतिरिक्त  शिक्षक यांनी उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आल्याने मुख्याध्यापक व शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे सदर कार्य हे गणपती सुट्टीनंतर करण्यात यावे.

प्रशांत रेडीज, प्रवक्ते, मुख्याध्यापक संघटना