कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शेकडो शिक्षकांची गेली १७ वर्षे प्रलंबित असलेली ३३ महिन्यांची थकबाकी अखेर त्यांच्या खात्यावर जमा झाली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिक्षण मंडळाच्या सुमारे ७५ पेक्षा अधिक शाळा असून त्या ठिकाणी शेकडो शिक्षक कार्यरत आहेत. या शाळांमधील शिक्षकांना सरकारी नियमानुसार वेतन व भत्ते देणे सरकार व महापालिकेला बंधनकारक आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना १ जानेवारी १९९६ पासून पाचवा वेतन आयोग लागू करण्यात आला. पण, शिक्षण मंडळातील शेकडो शिक्षकांना १ जानेवारी, १९९६ ते सप्टेंबर, १९९८ पर्यंतची ३३ महिन्याची फरकाची रक्कम अद्याप मिळाली नव्हती. ३३ महिन्यांची फरकाची थकबाकी भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करण्याचे निर्देश आहेत.
शिक्षकांना देय वेतनापैकी ५० टक्के वेतन सरकारकडून पालिकेला मिळते. तर ५० टक्के रक्कम महापालिकेने देणे अपेक्षित असते. तरीसुद्धा महापालिका शिक्षकांची थकबाकी देण्यास टाळाटाळ करीत होती. हा प्रश्न इतका चिघळला की अखेर आमदार रामनाथ मोते यांनी महापालिकेच्या विरोधात हक्कभंग आणण्याचा इशारा पालिका प्रशासनला दिला. अखेर प्रशासनाने नमते घेत शिक्षण मंडळाकडे १ कोटी २६ लाख रुपये जमा केले आहेत. गेले १७ महिने थकलेले पैसे शिक्षकांना परत केल्याने त्यांना अखेर न्याय मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी व्यक्त केली.