27 January 2021

News Flash

नव्या जबाबदारीने शिक्षक हैराण

खाटांच्या उपलब्धतेची माहिती अद्ययावत करण्याचे काम

(संग्रहित छायाचित्र)

इंद्रायणी नार्वेकर

करोना रुग्णालयांमधील खाटांचा ‘नोडल अधिकारी’ म्हणून लेखाजोखा ठेवण्याबरोबरच लक्षणे नसलेल्या रुग्णांना दाखल करून न घेणे, गंभीर नसलेल्या रुग्णांना घरी सोडणे या जबाबदाऱ्या पालिका शाळेच्या शिक्षकांवर टाकण्यात आल्याने ते हैराण झाले आहेत. एखाद्या रुग्णाला लक्षणे आहेत की नाही हे आम्ही कसे ठरवणार, तसेच थेट आलेल्या रुग्णांना नाकारताना काही प्रसंग उद्भवल्यास तो प्रसंग कसा हाताळणार, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

रिक्त झालेल्या खाटांची माहिती वेळेवर अद्ययावत करण्यात कसूर करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर पालिकेचे कर्मचारी नेमण्यात येत आहेत. रिक्त झालेल्या खाटांची दर तासाला अद्ययावत करण्याची जबाबदारी नोडल अधिकारी म्हणून शिक्षकांना देण्यात आली आहे. त्यासाठी पालिकेने संगणकीय डॅशबोर्ड कार्यान्वित केले आहेत. या डॅशबोर्डवर रुग्णालयांनी आपल्याकडील उपलब्ध खाटांची माहिती वेळोवेळी देणे अपेक्षित आहे. मात्र काही रुग्णालयांद्वारे विशेषत: खासगी रुग्णालयांद्वारे ही माहिती वेळेत दिली जात नसल्यामुळे पालिकेने कडक पावले उचलली आहेत. याअंतर्गत २२ नर्सिग होमना नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. पालिकेने २७ नर्सिग होमना नुकतीच करोना उपचारांसाठी परवानगी दिली होती. त्यामुळे सुमारे ४०० खाटा वाढल्या आहेत. मात्र यापैकी काही रुग्णालये वेळच्या वेळी खाटांच्या उपलब्धतेविषयी माहिती अद्ययावत करीत नाहीत, असे पालिका प्रशासनाला आढळून आले होते.

याअंतर्गत विभाग कार्यालयांनी नोडल अधिकारी म्हणून शिक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत. कुर्ला एल वॉर्ड आणि एफ दक्षिण विभागाने शिक्षकांना तसे आदेश दिले आहेत. परळमधील ग्लोबल रुग्णालय, टाटा रुग्णालय, आर्यन रुग्णालय, तर कुल्र्यातील फौजिया रुग्णालयात शिक्षकांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. आधीच ऑनलाइन शिक्षण, वॉर रूम आणि आता नोडल अधिकारी पदाची जबाबदारी दिल्यामुळे शिक्षक नाराज आहेत. या जबाबदारीवर तातडीने रुजू न झाल्यास पालिका अधिनियमातील सेवाशर्तीनुसार कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

नोडल अधिकाऱ्याच्या जबाबदाऱ्या

* दर तासाला उपलब्ध खाटांची माहिती अद्ययावत करणे.

* वॉर रूमला कळवल्याशिवाय कोणत्याही रुग्णाला दाखल करू नये.

* लक्षणे नसलेल्या रुग्णांना दाखल करून घेऊ नये.

* पालिकेच्या धोरणानुसार गंभीर नसलेल्या रुग्णांना घरी सोडणे.

* पालिकेच्या धोरणानुसार करोना उपचारांचे व्यवस्थापन होते आहे की नाही ते पाहणे.

* चोवीस तास फोनवर उपलब्ध राहणे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2020 1:01 am

Web Title: teachers harass with new responsibilities abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 जुन्या इमारतींचे ४० प्रस्ताव वर्षभरापासून पडून
2 टाळेबंदी शिथिलीकरणात ग्रंथालये दुर्लक्षितच
3 मॉलमध्ये डिजिटल प्रणालींचा वाढता वापर
Just Now!
X