मुंबई : शिक्षकांची दिवाळीची सुट्टी निवडणुकीच्या कामात गेल्यानंतर आता त्यांच्या उन्हाळी सुट्टीलाही कात्री लागणार आहे. उन्हाळी सुट्टीदरम्यान शिक्षकांना जनगणनेचे काम करावे लागणार आहे.

या वर्षी केंद्र आणि राज्य अशा दोन्ही निवडणुकांच्या कामात शिक्षक गुंतले होते. राज्याच्या निवडणुकीची कामे, त्याचे प्रशिक्षण यामध्ये शिक्षकांच्या दिवाळी सुट्टीचे दिवस कमी झाले होते. आता उन्हाळी सुट्टीवरही गंडांतर येणार आहे. या कालावधीत शिक्षकांना जनगणनेचे काम करणे भाग पडणार आहे. १ मे ते १५ जून या कालावधीत हे काम असेल. विद्यार्थ्यांना परीक्षा झाल्यावर एप्रिलपासून सुट्टी मिळत असली तरी शिक्षकांची सुट्टी ही १ मेपासून सुरू होते. त्यापूर्वी शिक्षकांना परीक्षा, निकाल यांची कामे असतात. राज्यातील शाळा या १५ जूनला सुरू होतात. त्यामुळे यंदा शिक्षकांना अजिबातच सुट्टी मिळणार नसल्याचे दिसत आहे. वर्षांतील ७६ पैकी ३९ सुट्टय़ा कमी होणार आहेत. महापालिका आणि खासगी शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षकांनी या कालावधीत मुख्यालय सोडून जाऊ नये,असे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

अध्यापनाच्या दिवसांमध्ये शिक्षकांना शाळाबाह्य कामे देण्यात येऊ नयेत असे न्यायालयाचे आदेश आहेत. त्यामुळे आता मे महिन्याच्या सुट्टीत शिक्षकांना कामाला लावण्यात येणार आहे. या आदेशाला शिक्षक संघटनांनी विरोध केला आहे. ‘मुळात शिक्षकांना अशैक्षणिक कामे लावण्यात येऊ नयेत. मात्र तरीही जनगणनेचे काम लावायचे झाल्यास मार्च, एप्रिलमध्येही जनगणनेचे काम करणे शक्य आहे, असे असताना मे महिन्यातच काम करण्याचे आदेश देणे चुकीचे आहे, असे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे.