इंग्रजी माध्यमाच्या प्रभावाने मराठी शाळांचा पट कमी होऊ लागल्याने खडबडून जागे झालेल्या ठाणे शिक्षण मंडळाने तो रोखण्यासाठी चक्क महापालिकेच्या शाळांमधील मराठी शिक्षकांनाच इंग्रजीचे धडे देण्यास सुरुवात केली आहे.
ठाणे शहरातील वेगवेगळ्या भागांत महापालिकेच्या १२४ प्राथमिक शाळा असून त्यामध्ये मराठी, उर्दू आणि गुजराती शाळांचा समावेश आहे. या शाळांमध्ये सुमारे ३२ हजार विद्यार्थी शिकत असून या विद्यार्थ्यांना ११०० शिक्षक शिकवितात. शहरात ५०० खासगी शाळा असून त्यामध्ये शंभरहून अधिक इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा समावेश आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पालकांचा कल वाढू लागल्यामुळे मराठी शाळेतील विद्यार्थ्यांच्या संख्येत दरवर्षी घट होऊ लागली आहे. त्यामुळे महापालिकेने इंग्रजी माध्यमांच्या पाच शाळा सुरू केल्या. तसेच पहिली ते तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सेमी इंग्रजी अभ्यासक्रम सुरू केला. असे असले तरी, गेल्या तीन वर्षांतील महापालिकेतील मराठी शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येचा आढावा घेता, दरवर्षी दोन हजारांनी पटसंख्या घटत असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली.  
मराठी शाळेतील पटसंख्या वाढविण्यासाठी मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे इंग्रजी शिकविण्याची गरज आहे. पण, मराठी शाळेतील शिक्षकांना उत्तम दर्जाची इंग्रजी येत नसल्यामुळे ते विद्यार्थ्यांना कसे शिकविणार, असा महापालिकेपुढे पेच आहे. तसेच इंग्रजी शाळांचा असाच प्रभाव रहिला तर भविष्यात मराठी शाळा बंद पडतील आणि या शाळेतील मराठी शिक्षकांचा भार महापालिकेवर पडेल अशी भीती प्रशासनाला आहे. या पाश्र्वभूमीवर मराठी शाळेतील शिक्षकांना इंग्रजीचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय महापालिकेच्या शिक्षण मंडळाने घेतला आहे. महापालिका शाळेतील शंभर शिक्षकांना नुकतेच इंग्रजी विषयाच्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले असून उर्वरित शिक्षकांनाही अशा प्रकारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी महिती महापालिका सूत्रांनी दिली.

शाळेची गुणवत्ता वाढेल
इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पालकांचा ओढा असल्यामुळे मराठी शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत घट होऊ लागली आहे. त्यामुळे मराठी शाळेतील शिक्षकांनाही उत्तम दर्जाचे इंग्रजी विद्यार्थ्यांना शिकविता यावे आणि त्यातून शाळेची गुणवत्ता तसेच पटसंख्येत वाढ व्हावी, या उद्देशाने मराठी शाळेतील शिक्षकांना इंग्रजी विषयाच्या तज्ज्ञांकडून विशेष प्रशिक्षण देण्यात आले, अशी माहिती महापालिकेचे शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे यांनी दिली. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची चांगली तयारी करून घ्यावी, यासाठी सुमारे २५० शिक्षकांना पुणे येथील तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांच्याही शिष्यवृत्ती परीक्षेच्या पाश्र्वभूमीवर सराव परीक्षा घेण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.