भविष्य निर्वाह निधीच्या वर्गणीदार असलेल्या मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीना हज किंवा इतर धार्मिक यात्रेसाठी पी एफ खात्यातून रक्कम काढण्यास परवानगी मिळाली आहे.
या संदर्भातील शासन निर्णय राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने नुकताच जाहीर केला. सरकारी कर्मचाऱ्यांबरोबरच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे.
भविष निर्वाह निधीच्या वर्गणीदारांना धार्मिक यात्रेसाठी ना-परतावा अग्रिम मिळावी यासाठी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी वित्त विभागाच्या सचिवांना, शालेय शिक्षण राज्यमंत्री फौझिया खान तसेच राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांना निवेदन दिले होते.
मोठा दिलासा
या संदर्भात झालेल्या अधिकाऱ्यांच्या बठकांमध्येही त्यांनी ही मागणी लावून धरली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत हा निर्णय जारी करण्यात आला आहे.
भविष्य निर्वाह निधीच्या वर्गाणीदारांना यामुळे मोठा दिलासा मिळाला असून त्यांचा धार्मिक यात्रांना जाण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे शिक्षक परिषदेचे मुंबई उत्तर विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी सांगितले.