शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना दर वर्षी राज्य तसेच केंद्र सरकारतर्फे ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार जाहीर केला जातो. १० हजार रुपये अधिक दोन वेतनवाढी अशा स्वरूपात हा पुरस्कार दिला जातो. पण यंदा या वेतनवाढीऐवजी एक लाख रुपये देण्यात येतील, असे शासनाने शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर करून शिक्षकांची मने जिंकली. मात्र, शिक्षकांच्या हाती प्रत्यक्षात दहा हजार रुपयांचाच धनादेश टेकवण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
राज्य सरकारच्या घोषणेनुसार पुरस्कार प्रदान होईल त्या वेळेस एक लाख दिले जातील, अशी अपेक्षा शिक्षकांना होती. परंतु शिक्षकदिनी पुरस्कार प्रदान होऊन १० दिवस उलटून गेले तरी ही रक्कम शिक्षकांना मिळालेली नाही. ती कधी मिळेल याबाबतही शिक्षकांना काहीच माहिती नाही. यामुळे पुरस्कारविजेत्या शिक्षकांमध्ये नाराजी आहे.
यावर्षी शिक्षण संचालकांनी उपलब्ध मंजूर अनुदानातून पुरस्कार जाहीर झालेल्या शिक्षकांचा खर्च भागवावा असे नमूद केले आहे. तसेच पुढील वर्षी अर्थसंकल्पात तरतुदीची सूचनाही केली आहे, असे असतानाही हा निधी मिळण्यास उशीर का व्हावा, असा सवाल मुख्याध्यापक महासंघाचे प्रवक्ते प्रशांत रेडीज यांनी उपस्थित केला.  
दरम्यान, दोन आगाऊ वेतनवाढीऐवजी एक लाख रुपयांची रक्कम जाहीर करण्यात आली असून ती नंतर दिली जाईल, असे शालेय शिक्षण सचिव अश्विनी भिडे यांनी स्पष्ट केले.
२००९मध्ये सहावा वेतन आयोग लागू झाल्यापासून शासनाने आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांना दोन आगाऊ वेतन वाढी प्रत्यक्षात दिलेल्याच नाहीत. त्यामुळे हे सर्व शिक्षक अद्याप वेतनवाढीच्या प्रतीक्षेत आहेत. यंदाच्या आदर्श शिक्षकांच्या वाटय़ालाही हीच प्रतीक्षा येणार का
– प्रशांत रेडीज, प्रवक्ते, राज्य मुख्याध्यापक महासंघ