16 September 2019

News Flash

शिक्षकांचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रंथालय!

माहितीच्या महाजालात उपलब्ध असलेल्या मोफत ध्वनिमुद्रित पुस्तकांचा शोध सुरू झाला.

सुप्रभात म्हणत वाफाळलेल्या चहाच्या कपाचे छायाचित्र पाहून तुमची ‘व्हॉट्सअ‍ॅप’ सकाळ झाली असेलच. राज्यातील सुमारे अडीच हजारहून अधिक शिक्षकांच्या व्हॉट्सअ‍ॅपवरील याच वाफाळलेल्या चहाच्या छायाचित्राची जागा नुकतीच ध्वनिमुद्रित पुस्तकांनी घेतली आहे. ‘व्हॉट्सअ‍ॅप वाचना’त पुस्तक वाचण्यास वेळ मिळत नसलेल्याची तक्रार करणाऱ्यांसाठी ठाणे जिल्हय़ातील चार शिक्षकांनी  चक्क व्हॉट्सअ‍ॅप ग्रंथालय सुरू केले आहे. या ग्रंथालयात तुम्हीही सदस्य होऊ शकता तेही अगदी मोफत.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात वाचनाला वेळ मिळत नाही. त्यातच तीन-चार वर्षांपूर्वी हातात आलेल्या स्मार्टफोनने वाचनाचा वेळ हिरावून घेतला. याला पर्याय म्हणून ई-बुक्स, ई-बुक रीडर अशा गोष्टी समोर आल्या. तरीही वाचनाचा वेळ गवसत नव्हता. यामुळे पुन्हा एकदा सर्वाना वाचनाकडे न्यावे या उद्देशाने भिवंडी तालुक्यातील अंजूर फाटा या गावातील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक अलंकार वारघडे यांनी आपल्या लॅपटॉपवर ई-पुस्तक संग्रह केला व हा संग्रह ते लोकांना उपलब्ध करून देऊ लागले. यात त्यांच्या पत्नी व जिल्हा शिक्षण संस्थेतील विषयतज्ज्ञ अर्चना यांनीही साथ दिली. मात्र हा प्रयत्न फारसा यशस्वी झाला नाही. तो वाचकांपर्यंत पोहचू शकला नाही.

यानंतर वारघडे दाम्पत्याने जिल्हा परिषद शिक्षक संतोष सोनावणे व त्यांच्या पत्नी व भिवंडी पालिका शाळेच्या शिक्षिका सुप्रभा सोनावणे यांच्यासमोर चांगल्या कल्पनेचे तंत्रज्ञान वापरूनही झालेली कुचंबणा मांडली. यावर चौघांनी विचारविनिमय केला असता ध्वनिमुद्रित पुस्तके तयार करून ती व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावीत अशी संकल्पना सुचली. मात्र एक पुस्तक संपूर्ण वाचले तर त्याचा अवधी किमान तीन तासांचा तरी लागणार. एवढा वेळ एखादी व्यक्ती पुस्तक ऐकू शकते का?  अशा प्रश्नांवर विचार केला असता प्रत्येक पुस्तकातील गोष्टींचे प्रसंगानुरूप भाग करून ती सात ते दहा मिनिटांच्या अवधीत उपलब्ध करून द्यायचे ठरले असे उपक्रमशील शिक्षक संतोष सोनावणे यांनी सांगितले.

माहितीच्या महाजालात उपलब्ध असलेल्या मोफत ध्वनिमुद्रित पुस्तकांचा शोध सुरू झाला. यातून श्यामची आई, पंचतंत्र, इसापनीती, प्रेरणादायी कथा अशा मूल्यशिक्षणावर आधारित ३५ मराठी पुस्तकांचा ध्वनिमुद्रित संग्रह मिळवला. पण यात आणखी भर घालण्याच्या उद्देशाने आम्ही चौघांनी हितोपदेशक गोष्टी, पाठय़पुस्तकातील वाचनीय कथा आणि कविता यांचे ध्वनिमुद्रण केले. आजमितीस या व्हॉट्सअ‍ॅप ग्रंथालयात ४२ पुस्तकांचे पुढील तीन वष्रे पुरतील इतके ध्वनिमुद्रित भाग तयार आहेत. म्हणजे जर एका शाळेत वर्षभर रोज हे ध्वनिमुद्रित पुस्तक ऐकविले गेले तर विद्यार्थ्यांची दहा पुस्तके ऐकून होतील. याशिवाय आणखी पुस्तकांची ध्वनिमुद्रण प्रक्रिया सुरू आहे.

या ग्रंथालयाचे काम येत्या काळात आणखी वाढणार आहे. हे काम अधिक सुलभ व्हावे यासाठी एका क्लिकवर पुस्तक सर्व सभासदांपर्यंत पोहचावे हा आमचा मानस. मात्र यासाठी आवश्यक तंत्रज्ञानाचे पाठबळ सध्याच्या तंत्रस्नेही समाजाने उपलब्ध करून दिल्यास हे ग्रंथालय प्रत्येक स्मार्टफोनवर पोहोचवणे शक्य होईल असेही ते म्हणाले.3

राज्यभरातून कौतुक

सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर ही पुस्तके एका शाळेत उपलब्ध करून देण्यात आली. शाळेतील मूल्य शिक्षणाच्या तासात सात ते दहा मिनिटांचे हे ध्वनिमुद्रित पुस्तक ऐकविले जाऊ लागले. या उपक्रमाला ठाणे जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी मीना शेंडकर-यादव यांनी प्रोत्साहन दिले व उपक्रमाचे अनावरण केले. ‘शिक्षणाची वारी’ या राज्य शासनाच्या उपक्रमात चारही शिक्षकांनी या उपक्रमाचे सादरीकरण केले. यानिमित्ताने चोवीस जिल्हय़ांपर्यंत या उपक्रमाची माहिती गेली व आजमितीस अडीच हजारहून अधिक शिक्षक या ग्रंथालयाचे सदस्य असून त्यांना रोज सकाळी आठ वाजता पुस्तकाचा एक भाग व्हॉट्सअ‍ॅपवर पोहोचतो अशी माहितीही सोनावणे यांनी दिली.

ग्रंथालयाचे वैशिष्टय़

  • मूल्य शिक्षणासाठी समाजमाध्यमाचा योग्य वापर.
  • दुर्लक्षित वाचन साहित्य विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे.
  • ग्रंथालयाचा व्हॉट्सअ‍ॅप समूह नाही.

असे व्हा सभासद

या ग्रंथालयाचे सभासद होण्यासाठी ‘९९७५५९१८६५’ या क्रमांकावर व्हॉट्सअ‍ॅप विनंती पाठवावी. तुमच्या विनंतीनंतर ग्रंथालयाच्या यादीत तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक नोंदविला जाईल व तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पुस्तके उपलब्ध होतील.

First Published on December 26, 2016 1:51 am

Web Title: teachers whatsapp library