बालभारतीच्या पाठय़पुस्तक निर्मितीसाठी काम करणाऱ्या शिक्षकांना ते सेवेस असलेल्या शिक्षण संस्थांकडून सहकार्य मिळत नसल्याने शिक्षक अडचणीत आले आहेत. पाठय़पुस्तक मंडळातील कामाचे दिवस कर्तव्यकाल ग्राह्य़ धरण्याबाबतचा शासन निर्णय अद्याप प्रसिद्ध न झाल्याने संबंधित संस्थांकडून शिक्षकांच्या सुट्टय़ा लावल्या जात आहेत.

बालभारतीच्या पाठय़पुस्तकांचे लेखन, समीक्षण यांसह विविध कामे राज्यातील शिक्षक करत असतात. त्यासाठी शाळा, महाविद्यालयांचे नियमित काम सांभाळून शिक्षक मंडळात येतात. माफक मानधनावर किंवा काही वेळा मानधन न घेताही शिक्षक पाठय़पुस्तक मंडळावर काम करतात. मात्र मंडळाच्या बैठकांना उपस्थित राहण्यास संस्था परवानगी देत नाहीत. अनेकदा शिक्षकांच्या रजा लावल्या जातात. अनेक संस्थांतील शिक्षकांच्या तीस ते चाळीस रजा लावण्यात आल्या असल्याची माहिती शिक्षकांनी दिली.

पाठय़पुस्तक मंडळातील कामाचा कालावधीही कर्तव्यकाळ धरण्यात यावा. पाठयपुस्तक मंडळाचे काम स्वीकारल्यानंतर तेथे शिक्षकांना पाठवणे संस्थांसाठी बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी शिक्षकांनी केली आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णय मात्र अद्यापही प्रसिद्ध झालेला नाही. त्यामुळे शिक्षकांची अडचण झाली आहे.

पूर्णवेळ संचालक नाही

पहिली ते बारावीपर्यंतची पाठय़पुस्तके तयार करणाऱ्या बालभारतीचे संचालकपदही सध्या प्रभारी खांद्यावर आहे. मजकूर, मंडळाच्या सदस्यांची निवड, शैक्षणिक बाबींवरील निर्णय अशी महत्त्वाची जबाबदारी संचालकांच्या खांद्यावर असते. डॉ. सुनील मगर निवृत्त झाल्यानंतर संचालकपदावर पूर्णवेळ नियुक्ती झालेली नाही.