गार्गी वर्मा

जीव टांगणीला लागलेल्या प्रत्येकाची ‘कथा’ वेगळी; ‘व्यथा’ एकच

रिझव्‍‌र्ह बँकेने पीएमसी बँकेवर घातलेल्या निर्बंधांचा अनेक खातेदारांना फटका बसला आहे. यात अपंग मुलाच्या पालकापासून ते आपली सारी बचत गमावलेल्या पर्यटन व्यावसायिक, लग्नाचे नियोजन विस्कटलेल्या २९ वर्षांणी ते मुलीला महाविद्यालयात पाठवण्याचे स्वप्न धुळीस मिळालेल्या एका मोलकरणीचा समावेश आहे.

काही खातेदारांकडे तातडीच्या उपचारांसाठीही पैसे नाहीत. आपल्या ठेवी परत मिळवून देण्यासाठी आणि गैरव्यवहार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याबाबत सरकार हस्तक्षेप करेल, अशी या सर्वाना आशा आहे.

दुसऱ्यांदा दुर्दैव

गौतम छाबरिया  (खाजगी कर्मचारी): २०१५ साली रूपी बँक दिवाळखोरीत गेल्याचे आम्हाला कळले, त्यावेळी माझी आई आणि मी आमच्या बचतीचा मोठा भाग गमावला. माझा पैसा सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन एक सहकारी बँक विसरल्याचे हे दुसरे उदाहरण आहे, असे  अंधेरीला राहणारे छाबरिया यांनी सांगितले. मला माझा मुलगा आणि आई यांच्या उपचारांचा खर्च करावा लागतो. तो पैसा मला पीएमसीतील बचतीतून मिळत होता. वडिलांनी मृत्यूपत्रान्वये दिलेल्या पैशातून माझ्या आणि आईच्या काही मुदती ठेवी होत्या, असे छाबरिया म्हणाले. मुलगा दिव्यांगांसाठीच्या ज्या शाळेत शिकतो, तिथली फी महिन्याला २५ हजार रुपये आहे. त्याची व्यवस्था कशी करावी याची काळजी आहे, शिवाय त्याच्या उपचारांचाही प्रश्न आहे, असे त्यांनी सांगितले.

वडापाववर गुजराण

शब्बीर खान (वाहतूकदार)  : गेली अनेक वर्षे मुंबईत खासगी वाहतूकदार म्हणून काम करणारे खान यांनी घरासाठी गुंतवणूक करण्याइतके पैसे जमवले होते. ‘‘ठाण्यात घर घेण्यासाठी २३ सप्टेंबरला मी १ लाख रुपये दिले आणि दुसऱ्या दिवशी माझ्याजवळ पैसेच नव्हते’’, असे ते म्हणाले. खान यांच्याकडे दोन मोटारी असून त्या त्यांच्या व्यवसायात वापरल्या जातात. आता त्यापैकी एक मोटार स्वत:च चालवण्याचा ते विचार करत आहेत. ‘माझ्या मुलांच्या शाळेची फी भरावी लागणार आहे, शिवाय, महिन्याचा घरखर्चही आहे. सध्या मी वडापाववर दिवस काढतो आहे’, असे त्यांनी सांगितले.

पत्नीवर शस्त्रक्रियेसाठीही पैसे नाहीत

विजय चौधरी, (उद्योजक) : औरंगाबाद येथील उद्योजक विजय चौधरी यांनी जुलै महिन्यात पीएमसी बँकेत खाते उघडले. मूतखडय़ाचा त्रास सोसणारी पत्नी शीतल (३३) यांच्या उपचारासाठी पैसे उभारण्यासाठी ते खटाटोप करत आहेत. ‘गेल्यावर्षीच पत्नीवर दोन शस्त्रक्रिया करण्याची गरज होती, परंतु मला ते शक्य नव्हते. वडिलोपार्जित मालमत्ता विकून एका शस्त्रक्रियेसाठी पैसा उभा केला आणि दुसरी शस्त्रक्रिया ऑक्टोबरमध्ये होणार होती. ती अंथरुणावर आहे. आता तिची शस्त्रक्रिया तर सोडाच, तिच्यासाठी औषधे कशी घ्यावीत, असा प्रश्न आहे, असे ते म्हणाले.

लग्न पुढे ढकलावे लागेल

विकास सिंह (खासगी कर्मचारी) : विकास फेब्रुवारी २०२० मध्ये लग्न करण्याच्या तयारीत होता. ‘गेले काही दिवस मी लग्नाची तयारी करत होतो. मी काही मुदत ठेवी ठेवल्या होत्या आणि त्यांची मुदत लवकरच संपणार होती. त्यातून माझे खर्च भागणार होते’, असे विकासने सांगितले. ‘‘विरारमध्ये  पीएमसी बँक माझ्या घराजवळ होती आणि ती रविवारीही पण सुरू असे. खाते उघडण्यापूर्वी मी याबाबत बरेच संशोधन केले होते, पण आता ते सर्व निर्थक आहे’, असे सिंह म्हणाला.

उपचारांसाठीही पैसे नाहीत

देवेन ओबेरॉय (उद्योजक) : नवी मुंबईत वाशी येथे राहणारे देवेन ओबेरॉय आणि त्यांचे वडील गुलशन यांच्या बँकेत अनेक मुदत ठेवी आहेत. ते म्हणाले, ‘‘प्राथमिक उत्पन्न म्हणून आम्ही बँकेतील ठेवींवर मिळणाऱ्या व्याजाच्या पैशांचा उपयोग करत होतो.’’ गुलशन ओबेरॉय यांच्यावर एमजीएम रुग्णालयात आठवडय़ातून दोनदा डायलिसिसचे उपचार करावे लागतात. त्यासाठी त्यांना पैशांची निकड आहे.

कामगारांचे वेतन कोठून देणार?

संजय लुंद, उद्योजक  : बँकेतील गैरव्यवहाराचा फटका घराला बसला आहे, असे संगणकाच्या सुटय़ा भागांची विक्री करणाऱ्या संजय लुंद यांनी सांगितले. अंधेरी येथे घराजवळ चुकीच्या ठिकाणी गाडी उभी केल्याने त्यांना वाहतूक पोलिसांनी दंड केला. परंतु तो भरण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नव्हते. माझ्याकडे दंड भरण्यासाठीही पैसे नाहीत, तुम्ही मला पोलीस ठाण्यात घेऊन चला, असे मी पोलिसांना सांगितले, असे लुंद म्हणाले. ते म्हणतात, मला दोन मुले आहेत. माझ्या दुकानात पाच कामगार आहेत. त्यांचे वेतन देण्यासाठीही माझ्याकडे पैसे नाहीत. माझ्या मुलांची फी भरू शकेन की नाही, हे मला आज माहीत नाही, असे लुंद यांनी सांगितले.

मुलीच्या शिक्षणाचे काय होणार?

शमिमा शेख, गृहिणी : बँकेच्या अंधेरी शाखेत शमिमा यांची २० वर्षांपासून मुदत ठेव आहे. त्या म्हणाल्या, ‘‘मी माझ्या मुलीच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी सुमारे तीन लाखांची बचत केली आहे. आता तिचे शिक्षण कसे पूर्ण करणार?’’